‘मी मुख्यमंत्री पदावर दावा केलाच नाही’, नितीश कुमार यांच्या दाव्याने खळबळ

bihar cm nitish kumar asked official to make rule to provide job for the family member of sc st if any one killed
जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार

बिहार निवडणुकीत एनडीएने स्पष्ट बहुमत प्राप्त केल्यानंतर जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन निकालांवर भाष्य केले. बिहारमध्ये विजय मिळवल्याबद्दल भाजपने कालच (दि. ११ नोव्हेंबर) दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात विजयोत्सव साजरा केला. तसेच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच एनडीए सरकार काम करेल, असे सांगितले. मात्र नितीश कुमार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी दावा केलेला नाही. बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय एनडीए घेईल.” नितीश कुमार यांच्या दाव्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली असून ते कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नितीश कुमार म्हणाले की, “एनडीएमध्ये सहभागी असलेले पक्ष एकत्र येऊन मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील. माझ्याकडून मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही दबाव नाही. एनडीएच्या बैठकीतच पुढील निर्णय होईल.”

दरम्यान नितीश कुमार म्हणाले की, बिहारच्या जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत दिलेले आहे. आम्ही सरकार नक्कीच बनवू. शपथविधी कधी असेल, याबाबत मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. एनडीएतील चार घटक पक्षांचे नेते एकत्र येऊन बैठक घेतील त्यानंतर तीन ते चार दिवसांत पुढचा निर्णय जाहीर करु, असेही नितीश कुमार यांनी सांगितले.

यासोबतच जनता दल युनायटेडच्या मतांच्या टक्केवारीत यावेळी घसरण आलेली आहे. त्याचा आढावा आणि विश्लेषण करण्याचे काम पक्षातर्फे करण्यात येत आहे. लोक जनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी जेडीयूच्या विरोधात उमेदवार उतरवले होते. मात्र आमचा पक्ष हा बिहारी जनतेच्या विकासासाठी काम करतोय, पुढेही हेच काम आम्ही करत राहू.