सरकार नितीश कुमारांचं पण सर्वात मोठा पक्ष तेजस्वी यादव यांचा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या २४३ जागांचा निकाल बुधवारी पहाटे लागला. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आहे. मात्र, तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये भाजपला ७४ तर राजदला ७५ जागा मिळाल्या आहेत. केवळ एका जागेने तेजस्वी यादव यांचा राजद पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राजदने १४४ जागा लढवल्या, त्यातील ७५ जागा जिंकल्या आहेत.

बिहार निवडणुकीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून मोठे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, भाजचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी बडे नेते मैदानात उतरले होते. मात्र, राजदचे युवा नेते तेजस्वी यादव यांनी जीवाचे रान करुन अनुभवी आणि वरिष्ठ नेत्यांना सळो की पळो करुन सोडले. तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, अमित शहा, नड्डा आणि संपूर्ण सत्तामंडळाशी एकहाती लढत दिली. तेजस्वी यादव यांनी दिवसाला १५ ते २० सभा घेऊन, निवडणूक प्रचारात विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे पुढे आणत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर दमदार आव्हान उभे केले. तेजस्वी यादव यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांना एकत्र घेत महागठबंधन तयार केले आणि निवडणूक लढवली. पण काँग्रेस पक्षाची घसरगुंडी झाल्याने मोठ्या प्रमाणात झाल्याचा फटका तेजस्वी यादवांना बसला. डाव्या पक्षांनी कमी जागा लढवून चांगली कामगिरी पार पाडली. मात्र तसे काँग्रेसला जमले नाही. कांग्रेसला १९ आणि डाव्या पक्षांना १६ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या घसरगुंडीने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले.

बिहारमधील अटीतटीच्या लढतीत NDA ने स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जदयु’ची पीछेहाट झाली आहे. जदयूला ४३ जागा मिळाल्या आहेत. नितीश कुमारांच्या प्रतिष्ठेला युवा तेजस्वी यांदव यांनी सुरुंग लावला आहे. तेजस्वी यादव यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांपासून दिग्गज नेते मैदानात असतानाही तेजस्वी यादव यांचे यश कौतुकास्पद आहे, असे शरद पवार म्हणालेत. शिवाय, शिवसेनेने आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक करताना त्यांचा पक्ष पहिल्या क्रमांकावर आणला हाच विजय असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – बिहारमध्ये NDA चं सरकार; नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ