उन्नाव बलात्कार प्रकरण: १०० टक्के गुन्हेगारी तर प्रभू रामचंद्रही संपवू शकत नाहीत – भाजप नेता

Barabanki
bjp minister raghavendra pratap asingh
भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री राघवेंद्र प्रताप सिंह

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला जाळून टाकण्याच्या घटनेला भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री राघवेंद्र प्रताप सिंह यांनी असंवेदनशील म्हटले आहे. याशिवाय शंभर टक्के गुन्हेगारी तर प्रभू रामचंद्र संपवू शकत नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ते गुरुवारी उत्तर प्रदेशच्या बाराबांकी जिल्ह्यात एका समिक्षा बैठकीत बसले होते. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.


हेही वाचा – उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला जाळण्याचा प्रयत्न; पीडित तरुणी ९० टक्के भाजली


‘आमच्या सरकारने दोषींवर वेळत कारवाई केली’

‘गुन्हेगारी प्रत्येक सरकारच्या काळात होते. मात्र, आमच्या सरकारने दोषींवर वेळेत कारवाई केली आहे. आम्ही आरोपींना पकडून जेलमध्ये डांबले आहे. आमच्या योगी सरकार आणि मोदी सरकारच्या काळात आरोपींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही. जर गुन्हा केल आहे तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल’, असे देखील राघवेंद्र प्रताप सिंह यावेळी म्हणाले.

काय उन्नाव बलात्कार प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये गुरुवारी बलात्कार केलेल्या नराधमांकडूनच पीडित तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेसोबत हा घृणास्पद प्रकार घडला. यामध्ये पीडित तरुणी ९० टक्के भाजली आहे. कोर्टाच्या सुनावनीसाठी पीडित तरुणी जात होती. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर येत आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी ३ जणांना अटक केली असून दोघांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.


हेही वाचा – उन्नाव बलात्कार प्रकरण – आरोपी कुलदिप सेनगरच्या भावाचा मृत्यू


भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरने काही साथीदाऱ्यांसह पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली गेली होती. या पीडितेने आपल्याला न्याय मिळावा यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला होता. त्यानंतर भाजपने या आमदाराची पक्षातून देखील हकालपट्टी केली होती. तेव्हापासून कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरु होती. दरम्यान, आज कोर्टात सुनावणीसाठी जात असताना पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. यात पीडित तरुणी ९० टक्के भाजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.