शत्रुघ्न सिन्हांची नाव काँग्रेसच्या दिशेने? मोदींवर टीका तर राहुल गांधींचं कौतुक!

कोलकात्यामध्ये विरोधकांच्या महारॅलीमध्ये भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोंडसुख घेतलं आहे. आणि त्याच वेळी राहुल गांधींवर त्यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत.

Kolkata
Shatrughan Sinha
भाजपवर टीका करून शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसवासी

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे मुंबईत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन करत असतानाच दुसरीकडे कोलकात्यामध्ये मोदी आणि भाजपविरोधी पक्षांची मोठी सभा भरली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीमध्ये सर्वच पक्षीयांनी सहभाग घेतला असून ‘मोदी भगाव’चा नारा या पक्षांनी दिला आहे. मात्र, त्यामध्ये सर्वात चर्चेत आलेलं नाव म्हणजे भाजपचे खासदार शत्रूघ्न सिन्हा. शत्रूघ्न सिन्हा भाजपचे असून देखील त्यांनी विरोधकांच्या या महारॅलीला उपस्थिती लावली आहे. आणि फक्त उपस्थितीच लावली नसून त्यांनी विरोधांवर तोडसुख देखील घेतलं आहे. त्यांची ही कृती भाजपच्या वरिष्ठांना चांगलीच झोंबली असून शत्रूघ्न सिन्हा यांच्याविषयी निर्णय घेतला जाईल असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

शत्रुघ्न सिन्हांची डायलॉगबाजी!

शत्रूघ्न सिन्हा यांनी त्यांच्या भाषणात त्यांच्या मूळ ‘डायलॉग’ शैलीत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘मी आधी भारतीय जनतेचा आहे आणि नंतर भारतीय जनता पक्षाचा आहे’, असं ते म्हणाले. तसेच, ‘जोपर्यंत मोदी सर्वांसमोर येऊन नोटबंदीबाबत बोलत नाहीत, तोपर्यंत मोदी चोर है ही टीका त्यांना ऐकून घ्यावी लागेल’, असं देखील ते म्हणाले. यावेळी बोलताना ‘सच बोलना बगावत है, तो समझो मैं बागी हूँ, मैं सच के साथ, सिद्धांतो के साथ समझौता नहीं कर सकता’, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

ज्येष्ठांबद्दलचं शल्य बोलून दाखवलं

एकीकडे शत्रूघ्न सिन्हांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांमध्ये टीका केलेली असतानाच पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं घ्यायला ते विसरले नाहीत. ‘नोटबंदीचा निर्णय ही मोदींची मनमानीच होती. जर तो पक्षाचा निर्णय असता, तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना त्याची कल्पना असती’, असं ते म्हणाले. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांना मोदींनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून बाहेर काढल्याचं शल्य शत्रूघ्न सिन्हांच्या टिकेतून जाणवत होतं.

‘राहुल गांधी तुम्ही बरोबर आहात!’

दरम्यान, शत्रूघ्न सिन्हांनी राहुल गांधींचं कौतुक केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘मैं बागी हूँ’, असं म्हणताना राहुल गांधींनी नोटबंदीवरून नरेंद्र मोदींवर केलेल्या टिकेचं त्यांनी समर्थन केलं. ‘नोटबंदीमधून जनता सावरलेली नसतानाच मोदींनी गब्बर सिंह टॅक्स लावल्यामुळे जनतेची अवस्था वाईट’ झाल्याचं सिन्हा यावेळी म्हणाले. त्यामुळे, शत्रुघ्न सिन्हांची नाव येत्या काळात कोणत्या दिशेने सरकणार आहे, याचीच छोटीशी झलक या रॅलीत पाहायला मिळाल्याचं राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here