घरताज्या घडामोडी'त्या' वक्तव्यावरून संसदेत गदारोळ; मात्र राहुल गांधी वक्तव्यावर ठाम

‘त्या’ वक्तव्यावरून संसदेत गदारोळ; मात्र राहुल गांधी वक्तव्यावर ठाम

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्यावरून आज, शुक्रवारी लोकसभेत भाजप नेत्यांचा गदारोळ पहायला मिळाला. खासदार स्मृती इराणी यांच्यासोबत भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर बोलताना राहुल गांधी यांनी आपण कधीही त्यांची माफी मागणार नाही, असे म्हटले असून महत्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

झारखंडमधील एका जाहीर सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, झारखंडपासून उत्तर प्रदेशपर्यंत कुठेही पाहा, बलात्काराच्या घटना वाढत आहेत. भाजपाचे एक आमदारही बलात्काराच्या खटल्यात आरोपी आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावरही काही बोलत नाहीत. पंतप्रधान ‘बेटी बचाव’चा नारा देतात. परंतु कोणापासून मुलींचं संरक्षण करायचं हे सांगत नाही. त्यांना भाजपाच्या आमदारांपासून वाचवण्याची गरज आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून लोकसभेनंतर राज्यसभेतही गदारोळ पहायला मिळाला.

- Advertisement -

माफी मागणार नाही – गांधी

राहुल गांधी यांनी संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझ्या मोबाइलमध्ये एक व्हिडीओ क्लिप आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणत आहेत. हा व्हिडीओ मी ट्विट करणार आहे जेणेकरुन सर्वांना पाहता येईल. भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शाह ईशान्य भारत जाळत आहेत. त्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठीच नरेंद्र मोदी आणि भाजपा माझ्यावर आरोप करत आहेत”. तसेच “प्रत्येक पेपरमध्ये रेप इन इंडियाची बातमी वाचायला मिळत आहे असं मी म्हटलं होतं. नरेंद्र मोदी हिंसेचा वापर करतात. आज संपूर्ण देशात हिंसाचार सुरु आहे. महिलांवर, ईशान्य भारत, जम्मू काश्मीर सगळीकडे हिंसाचार सुरु आहे”, अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली.

हेही वाचा –

‘कर्तृत्वाने मोठे व्हा’, पंकजा मुंडेंच्या बंडाविरोधात भाजपचे नेते मैदानात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -