घरCORONA UPDATEयाला म्हणतात डोकॅलिटी! लॉकडाऊनमध्ये लग्नासाठी शोधली भन्नाट पळवाट!

याला म्हणतात डोकॅलिटी! लॉकडाऊनमध्ये लग्नासाठी शोधली भन्नाट पळवाट!

Subscribe

गेल्या अडीच महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मे अखेरीसपर्यंत हा लॉकडाऊन कठोर ठेवण्यात आला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक १.०च्या माध्यमातून लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, असं जरी असलं, तरी त्या त्या राज्याला हे नियम शिथिल करणे किंवा कठोर ठेवण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येचा विचार करता काही नियम कठोरच ठेवण्यात आले आहेत. त्यातलीच दोन राज्य म्हणजे तमिळनाडू आणि केरळ. या राज्यांमध्ये अजूनही रुग्ण आढळत असल्यामुळे त्यांनी आंतरराज्य प्रवासावर निर्बंध कायम ठेवले आहेत. नेमकं यामुळेच एका जोडप्याच्या लग्नामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. पण या नियमांमधून एक भन्नाट पळवाट या जोडप्याने शोधून काढली आणि सरकारी कर्मचाऱ्यांनाच त्यांचं लग्न लावून द्यावं लागलं!

तर ही गोष्ट आहे तमिळनाडूच्या कोयम्बतूरमध्ये राहणारा रॉबिनसन आणि केरळच्या मुन्नारची राहणारी प्रियंका यांच्या लग्नाची. अगदी सुरुवातीला या दोघांचं २२ मार्च रोजी लग्न ठरलं होतं. पण बहुधा नशीब आडवं आलं आणि लॉकडाऊनची घोषणा झाली. लग्नखरेदीपासून सर्व तयारी झाल्यामुळे मुलीकडच्यांनी लग्नासाठी कोयम्बतूरला जाण्यासाठी तब्बल दोन महिने जंग जंग पछाडलं. पण त्यांना काही यश मिळालं नाही. केरळमधल्या लोकांसाठी पवित्र मानला जाणारा कर्किडाका महिना जवळ येत असल्यामुळे आणि या महिन्यात लग्न करता येत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. यावेळी मात्र त्यांना देव पावला!

- Advertisement -

सीमेवरच लग्नाचा घातला घाट!

स्थानिक माजी आमदार एके मनी यांच्या मध्यस्थीमुळे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रवासासाठीचे पास मिळाले. रॉबिनसनला केरळमध्ये जाण्यासाठी आणि प्रियंकाला तमिळनाडूमध्ये प्रवेश करण्याचे पास मिळाले. पण त्यांच्यासोबत जाण्यासाठी इतक्या संख्येने असणाऱ्या नातेवाईकांना मात्र पास द्यायला प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे फक्त नवरा-नवरीकडेच प्रवासाचे पास आले. मग त्यांनी एक भन्नाट कल्पना शोधून काढली. केरळमधल्या इडुकी जिल्ह्याजवळच्या चिनार चेकपोस्टवर या दोन्ही राज्यांच्या सीमा एकत्र येतात. या पठ्ठ्यांनी थेट सीमारेषेवरच लग्न करण्याचा घाट घातला! म्हणजे ना इकडच्या लोकांना तिकडे जायची गरज, ना तिकडच्या लोकांना इकडे यायची गरज! शिवाय सीमा ओलांडल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन होण्याचीही आवश्यकता नाही!

७ जूनची तारीख ठरली. चिनार चेकपोस्टपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कट्टलाई मरियमन मंदिरात लग्न करण्याचं ठरलं. पण ऐनवेळी पुन्हा माशी शिंकली. तामिळनाडूमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे सीमेवर कठोर निर्बंध पुन्हा लागू झाले. सीमेपासून मंदिरापर्यंत जाण्याची देखील परवानगी नाकारण्यात आली. मग तर ही मंडळी इरेला पेटली. शेवटी सीमेवर म्हणजे अगदी सीमारेषेवरच लग्न करण्याचं ठरलं. म्हणजे दोन्हीकडच्या प्रशासनाला हरकत असण्याचं कारण उरलं नाही!

- Advertisement -

kerala marriage (Photo - the news minute)

मंडप म्हणून सतरंजी, पूजा म्हणून समई!

चिनार चेकपोस्टवर असलेल्या फॉरेस्ट विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लग्नाची व्यवस्था लावली. मंडप म्हणून चेकपोस्टवरच्या रस्त्यावर टाकली एक सतरंजी. पूजासाहित्य म्हणून एक समई, काही फळं, नारळ आणि हार! या लग्नात भटजी देखील नव्हता! कुटुंबियांनीच हे सोपस्कार पार पाडलं. फक्त वर-वधूच्या आई-वडिलांनाच त्या ‘मंडपा’च्या भोवती यायची परवानगी मिळाली. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी वर-वधूच्या हातांवर सॅनिटायझर टाकलं. आणि सर्व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून अखेर हे लग्न पार पडलं. लग्नानंतर वर-वधूला आई-वडिलांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद देखील घेता आले नाहीत! शेवटी नवऱ्या मुलीला आपली बॅग स्वत:च उचलून तामिळनाडू सीमारेषेत नवरदेवासोबत प्रवेश करावा लागला! आता लॉकडाऊन उठून सर्वकारी स्थिरस्थावर झालं, की पुन्हा एकमेकांच्या घरी येऊन छोटेखानी विधी करणार आहेत म्हणे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -