याच सुरुंगातून आले होते नगरोटा हल्ल्यात मारले गेलेले अतिरेकी

pakistan tunnel
याच सुरुंगातून अतिरेकी पाकिस्तानातून भारतात आले.

नगरोटा चकमकीत पाकिस्तानच्या ४ अतिरेक्यांचा खात्मा भारतीय सुरक्षा दलाने केला होता. त्यानंतर आता सुरक्षा दलाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टर येथे पाकिस्तानच्या जवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर बीएसएफ आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत एका सुरुंगाचा शोध लागला आहे. ही सुरुंग आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ १६० मीटर अंतरावर आहे. याच सुरुंगाच्या माध्यमातून पाकिस्तानातील अतिरेकी आपल्या सीमेत शिरकाव करत असल्याचे सांगितले जात आहे. नगरोटा येथे मारले गेलेले अतिरेकी याच मार्गाने आले असल्याचा संशय सैन्यदलाच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे.

सुरक्षा दलाने शोधलेली ही सुरुंग १६० मीटर लांब आहे. याची खोली २५ मीटर असून सीमेवरील कुंपणापासून ती ७० मीटर अंतरावर आहे. नगरोटा चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे चार अतिरेकी ठार झाले होते. त्यानंतर आता तीन दिवसांनी सुरक्षा दल आणि पोलिसांनी या सुरुंगचा शोध लावला. या भागात आणखी शोधकार्य सुरु असून आणखी सुरुंग आहेत का? याचा तपास केला जात आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली शोध पथक नेमण्यात आले होते. या पथकाला पहिल्यांदाच अशाप्रकारची सुरुंग शोधून काढण्यात यश आले आहे. सुरुंगाचे तोंड एका झुडुपात होते. मोठ्या खुबीने ही सुरुंग खोदण्यात आली होती. जेणेकरुन त्याचा तपास कुणाला लागू नये. या सुरुंगला माती आणि पाला पाचोळ्याने झाकून ठेवण्यात आले होते. ही सुरुंग काही दिवसांपूर्वीच खोदण्यात आली असून त्याचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता सैनिकांनी व्यक्त केली आहे. या सुरुंगच्या पलीकडे पाकिस्तानच्या चक भूरा, रजब साहित आणि आसिफ साहिद या सीमा लागतात.

pakistan tunnel karachi bag

जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक यांनी सांगितले की, “सुरुंग मिळाल्यानंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जाहीर झाला आहे. ही सुरुंग नवीन असून त्याच्या बाजूला कराची मधील मातीच्या गोण्या देखील सापडल्या आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याचा हा आणखी एक पुरावा असल्याचे सिद्ध झाले आहे.”