सपा-बसपामध्ये विनाकलह जागावाटप निश्चित!

गेली अनेक वर्ष एकमेकांना पाण्यात पाहाणाऱ्या सपा-बसपाने उत्तर प्रदेशमध्ये जागावाटप पूर्ण केलं असून दोन्ही पक्षांनी ८० पैकी ७५ जागा आपापसांत वाटून घेतल्या आहेत.

Mumbai
Akhilesh Yadav Mayawati together
अखिलेश यादव आणि मायावतींची आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये अक्षरश: विळ्या-भोपळ्याचं नातं असलेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षामध्ये युती झाल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. इथे महाराष्ट्रात २५ वर्ष मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपासाठी आणि आघाडीसाठी इतका वाद सुरू असताना उत्तर प्रदेशमधल्या या दोन्ही शत्रुत्व असणाऱ्या पक्षांनी युती करून सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. इतकंच नाही, तर त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला महाराष्ट्राच्या तुलनेने अगदीच सहज पार पडला असं म्हणायला हरकत नाही. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून बसपा ३८ तर सपा ३७ जागा लढवणार आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या सपाने पडती बाजू घेत १ जागा कमी लढवण्याचा निर्णय घेतला आहे.


वाचा युतीत काय होतंय – युतीचे साईड इफेक्ट्स; २४ तासात नाराजी नाट्याला सुरूवात!

मित्रपक्षांसाठी सोडल्या ५ जागा

काँग्रेससोबत महाआघाडीत असलेल्या सपा आणि बसपाने उत्तर प्रदेशमधल्या एकूण ८० जागांपैकी ५ जागा मित्रपक्षांसाठी सोडून उरलेल्या ७५ जागांचं वाटप आपापसात केलेलं आहे. यामध्ये काँग्रेससाठी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांचे अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आले आहेत. मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगर हे उरलेले ३ मतदारसंघ राष्ट्रीय लोकदलला दिले आहेत.

राखीव जागांवर बसपाचाच झेंडा!

दरम्यान, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या मतदार संघांवर बसपने दावा केला आहे. ८० पैकी १७ मतदारसंघ हे राखीव असून त्यातले १० मतदारसंघ मायावतींच्या बसपला सोडण्यात आले आहेत. तर उर्वरीत ७ मतदारसंघ सपला सोडण्यात आले आहेत. साधारणपणे पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश अशी विभागणी करण्यात आली असून पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदारसंघ सपासाठी तर पूर्व उत्तर प्रदेशातील मतदारसंघ बसपासाठी सोडण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here