आता ‘सुश्री’ नव्हे, फक्त ‘मायावती’! बसपा अध्यक्षांनी नाव बदललं!

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या नावापुढून सुश्री ही पदवी काढून फक्त मायावती असं नाव केलं आहे. पण हे त्यांनी त्यांच्या कागदोपत्री नावात केलं नसून ट्विटर हँडलवर केलं आहे.

Mumbai
Mayawati BSP

काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस(उत्तर प्रदेश पूर्व) प्रियांका गांधी यांचं ट्विटरवर आगमन झालं आणि अवघ्या काही तासांमध्ये त्यांचे तब्बल ४० हजार फॉलोअर्स झाले! आणि तेही एकही ट्वीट न करता! ही बातमी प्रकाशित होईपर्यंत त्यांच्या अकाऊंटवर एकही ट्वीट झालेलं नाही. पण त्यांचे फॉलोअर्स मात्र २ लाखांच्या घरात जाऊन पोहोचलेत. त्यामुळे हल्ली सर्वच प्रकारचे ट्विटरीट्स राजकारणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी ट्वीटरबद्दल फारसं काही माहीत नसलं, तरी मतदान करणारा मोठा वर्ग हा तरूण आणि म्हणून ट्वीटरीट आहे, याची जाण असल्यामुळे जवळपास सगळेच राजकारणी ट्विटरवर आले आहेत.

निवडणुकांपूर्वीचा ‘ट्विटर’ योगायोग!

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी देखील पार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटर अकाउंट सुरू केलं. त्यावेळी त्यांनी त्यांचं ट्विटर हँडलचं नाव @SushriMayawati असं ठेवलं होतं. पण मायावतींनी त्यांचं पहिलं ट्विट केलं तब्बल २ महिन्यांनी म्हणजेच २२ जानेवारी २०१९ला. आता लोकसभा निवडणुका अवघ्या ३ महिन्यांवर आलेल्या असताना आणि भाजपची झाडून सगळी नेतेमंडळी ट्विटरवर ट्रोलर्सच्या गराड्यामध्ये धुमशान प्रचार करत असतानाच मायावतींनी ट्विटरवर कमबॅक करत त्यांचं पहिलं वहिलं ट्वीट करावं, हा बहुधा योगायोग असावा.

पहिल्यांदाच लिहिलं फक्त ‘मायावती’!

तर मायावतींनी नुकतंच म्हणजे १३ फेब्रुवारीला त्यांच्या ट्विटर हँडलमध्ये एक ‘मोठा’ बदल केला आहे. वास्तविक पाहाता हा बदल सामान्य नेटिझन्ससाठी अगदी काही अक्षरांचा आहे. पण त्यामागचा राजकीय तडजोड फार मोठी आहे. मायावतींनी त्यांचं ट्विटर हँडल @Sushrimayawati वरून फक्त @Mayawati इतकंच केलं आहे. आपल्या नावापुढची पदवीच मायावतींनी ट्विटरवरच्या जनसेसाठी काढून टाकली आहे. वास्तविक गेल्या सुमारे २ दशकांपासून मायावतींचं नाव किमान त्यांच्या पक्षामध्ये आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये, सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘सुश्री मायावतीजी’ असंच घेतलं जात आहे. पण आता पहिल्यांदाच त्यांनी स्वत:चंच नाव फक्त ‘मायावती’ असं लिहिलं असावं.

ट्रोलर्सच्या हातात जळतं कोलीत!

मायावतींनी त्यांचं नाव बदलताच त्यांच्या फॉलोअर्सनी जसा जलसा सुरू केला, तसेच ट्रोलर्स देखील ‘अॅक्टिव्ह’ झाले आहेत. मायावतींच्या याच ट्विटवर त्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

नाम में से ‘सुश्री’ हटाना पडेगा!

मायावतींचं ट्विटर अकाउंट सुरू होऊन ४ महिने झाले आहेत. मात्र, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखापर्यंत सुद्धा पोहोचू शकलेली नाही. तर दुसरीकडे, प्रियांका गांधींचं अकाउंट सुरू होताच दोनच दिवसांत त्यांचे फॉलोअर्स २ लाखांच्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे साहजिकच मायावतींनी आपल्या सोशल मीडिया टीमचे कान पिळले असतील यात शंका नाही. आणि बहुतेक याच टीमने त्यांना ‘नाम में से सुश्री हटाना पडेगा!’ असं सांगितलं असावं. एरवी ज्योतिष जसे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नावामधली काही अक्षरं कमी किंवा वाढवायला सांगतात, तसाच काहीसा सल्ला मायावतींना त्यांच्या ट्विटरवरील भविष्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया भविष्यकारांनी दिला असावा.

ट्विटरवरचा कमबॅक सत्तेत फायदेशीर ठरेल?

टेक्निकली बोलायचं झालं, तर मायावतींनी त्यांच्या नावापुढचं सुश्री काढल्यामुळे ट्विटरवर त्यांना टॅग करायला किंवा त्यांचं ट्विटर हँडल शोधायला त्यांच्या हितचिंतकांना, फॉलोअर्सला, कार्यकर्त्यांना आणि टीकाकारांनाही आता फार कष्ट पडणार नाहीत. शिवाय, गुगलमध्ये नुसतं मायावती टाकलं, तरी त्यांचं अकाउंट अगदी सहज सापडेल. आता नावातली आद्याक्षरं वगळायचा फायदा मायावतींना काय होईल, ते आत्ताच निश्चितपणे सांगता येणं कठीण आहे. पण ते काहीही असलं, तरी मायावतींचं ट्विटरवरचं हे कमबॅक त्यांना उत्तर प्रदेशमधल्या सत्तेमध्ये कमबॅक करण्यासाठी फायदेशीर ठरावं, म्हणून हा सगळा खटाटोप सुरू असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here