Video: इमारत कोसळण्याचा व्हिडिओ पाहून म्हणाल ‘वाचलेली महिला खरंच नशीबवान’

थरारक सीसीटीव्ही फुटेज

मध्य भारतात सध्या तुफान पाऊस बरसत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा राज्यात तर पावसाने हाहाकार उडवला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पावसामुळे जवळपास ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांची हैदराबादमध्ये भिंत कोसळल्यामुळे ९ लोकांचा मृत्यू झाला होता. आता हैदरबादमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक जुनी इमारत क्षणाधार्त जमीनदोस्त झाल्याचे दिसत आहे. ही इमारत कोसळण्यापुर्वी त्या इमारतीजवळून एक महिला जात होती. पण व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो? मृत्यूच्या दाढेतून वाचणं म्हणजे काय असतं? हे या व्हिडिओवरुन तुमच्या लक्षात येईल.

हैदराबादच्या मुगलपुरा भागातील सीसीटीव्ही फुटेजचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही पाहू शकता की, एका मंदिराच्या बाजूला दोन मजली जुनी इमारत आहे. कदाचित अर्ध्यातूनच या इमारतीचे बांधकाम थांबविण्यात आले होते. एक महिला मंदिराच्या दिशेने इमारतीकडे चालत येत असल्याचे दिसत आहे. मात्र ती जशी इमारचीजवळून जात असते, तेवढ्यात इमारतीचे पत्त्याप्रमाणे खाली कोसळतात.

इमारत कोसळत असताना महिला सावध होऊन लगेचच थोडी दूर हटण्याचा प्रयत्न करते. काही सेकंदाच्या आत हा सर्व प्रकार घडून जातो आणि महिलेचे प्राण थोडक्यात वाचतात. जर काही पावलं जरी ही महिला मागे असती, तरी तिचा जीव धोक्यात आला असता. या थरारक प्रसंगामुळे सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हैदराबादला पावसाने चांगलेच झोडपले असून काही दिवसांपुर्वी शहरात आलेल्या एका पुरामुळे रस्त्यावरुन एक व्यक्ती वाहून गेला असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या व्यक्तिची कुणीही मदत करु शकले नव्हते, त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्या तुलनेत या महिलेचे नशीब चांगलेच बलवत्तर होते, म्हणून ती थोडक्यात वाचली.