Video: राजधानी दिल्लीत माथेफिरू कारचालकाचा तमाशा!

राजधानी दिल्लीमध्ये एका माथेफिरू चालकाने केलेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फूटेज सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

New Delhi
Delhi Car Accident
दिल्ली कार अपघात

राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी संध्याकाळी एका कारचालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. मात्र, ज्या पद्धतीने हा अपघात झाला, ते पाहाता सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाली नाही असंच म्हणावं लागेल. गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या अपघातामध्ये केवळ चालकाच्या निष्काळजीपणामुळे मोठी जीवितहानी होता होता राहिली. या प्रकाराचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं असून त्यामध्ये अपघाताची दृश्य कैद झाली आहेत. अपघातानंतर हा चालक फरार असून पोलिसांनी त्याच्याविरोधात निष्काळजी ड्रायव्हिंग आणि इजा पोहोचवण्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. या चालकाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

काय झालं नक्की?

दिल्लीच्या ओल्ड गुप्ता कॉलनी भागामध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास मोठी गर्दी असते. इथल्या चौक परिसरामध्ये माणसांची आणि वाहनांची देखील बरीच वर्दळ असते. संध्याकाळी एक काळ्या रंगाची सडॅन कार भरधाव वेगाने गर्दीतून वाट काढत आली. यावर आसपासच्या लोकांनी कारचालकाला थांबवून त्याच्याशी हुज्जत घातली. याचा राग डोक्यात ठेऊन चालक पुढे गेला खरा. पण काही अंतरावर गेल्यानंतर हा कारचालक थांबला आणि पुन्हा गाडी तितक्याच वेगाने रिव्हर्स घेतली ती थेट गर्दीमध्येच घातली. आणि जितक्या वेगाने तो मागे आला, तितक्याच वेगाने तो फरार देखील झाला.

जखमी व्यक्तीची तक्रार

दरम्यान, या अपघातामध्ये कमल अरोरा नामक व्यक्ती जखमी झाली असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कमल अरोरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गाडीमध्ये दोन व्यक्ती बसल्या होत्या. त्यांचं तिथल्या लोकांशी भांडण झालं. त्यानंतर कारचालकानं कार पुढे नेऊन जोरात रिव्हर्स घेतली. या परिसरातले सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज सध्या पोलीस तपासत असून अद्याप फरार कारचालकाची ओळख कळू शकलेली नाही.