Video : भीषण! गाडीत बसताना काळजी घ्या; ‘या’ महिलेला कल्पनाही नव्हती की असं काही घडेल!

पहिल्या चित्रात महिला कारची चावी लावताना आणि दुसऱ्या चित्रात अडकलेली महिला..

चारचाकी गाड्यांची संख्या वाढल्याचं आपण अनेकदा ऐकतो. रस्त्यांवर धावणाऱ्या वेगवेगळ्या कार्स पाहून आपल्याला ते पटतं देखील. अशा गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. त्यामुळेच या गाड्यांची सुरक्षा आणि त्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा ही देखील तितकीच महत्त्वाची ठरते. त्यातही जर प्रवाशांनी योग्य ती काळजी घेतली नाही, तर भीषण परिणामांचा सामना करावा लागू शकतो. प्रसंगी घडणारा अपघात जीवघेणाही ठरू शकतो. बंगळुरूमध्ये एका महिलेचा तिच्याच कारमध्ये बसताना झालेला विचित्र अपघात इतका भयंकर ठरला की यात संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही फूटेजमधून हा विचित्र प्रकार नक्की घडला कसा, हे स्पष्टपणे दिसत आहे.

नक्की घडलं काय?

बंगळुरूच्या सदाशिवनगरमध्ये सदर ४५ वर्षीय महिला तिचे पती आणि त्यांचा मुलगा वास्तव्यास होते. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे, ही महिला तिच्या सेडान कारजवळ आली. तिने दरवाजा उघडला आणि काही क्षणातच कार उलटी जाऊ लागली. दरवाजा उघडा असल्यामुळे कारसोबतच ही महिला देखील फरफटत गेली आणि बाजूलाच असलेलं झाड आणि कारमध्ये चिरडून या महिलेचा मृत्यू झाला.

पण कार अचानक मागे कशी गेली?

याचा तपास पोलिसांनी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला. लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असल्यामुळे सदर महिलेचं कुटुंब कुठेही बाहेर फारसं जात नव्हतं. पण कारचं इग्निशन खराब होऊ नये, म्हणून आठवड्यातून एक-दोनदा ते गाडीला चावी लावून ती फक्त सुरू करत असत आणि पुन्हा बंद करत असत. त्या दिवशी देखील सदर महिलेने गाडीचा दरवाजा उघडला आणि आत न बसताच चावी लावून गाडी सुरू केली.

…तर महिलेचा प्राण वाचला असता!

पण इथेच चुकलं. याआधी जेव्हा गाडी बंद करण्यात आली होती, तेव्हा ती रिव्हर्स गिअरमध्येच बंद केली गेली होती. त्यासोबतच हँड ब्रेक देखील लावण्यात आलेला नव्हता. महिलेने गाडीत बसण्याआधीच दरवाजा उघडा असताना चावी सुरू केली. गाडी सुरू होताच रिव्हर्स गिअर असल्यामुळे गाडी लगेच मागे गेली. पण दरवाजा उघडा असल्यामुळे दरवाजासोबत महिला देखील फरफटत मागे जाऊ लागली. बाजूलाच एक झाड असल्यामुळे झाडाला दरवाजा लागला आणि त्यामध्ये येऊन महिलेचा मृत्यू झाला. जर गाडी रिव्हर्स गिअरमध्ये नसती किंवा महिलेने गाडीत बसल्यानंतर चावी लावली असती किंवा दरवाजा बंद असताना जरी चावी लावली असती, तरी महिलेचा प्राण वाचला असता!

पाहा घटनेचं सीसीटीव्ही फूटेज!