असे आहे, कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याचे महत्त्व!

Mumbai

यंदा २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात आली आहे. आज सर्वत्र गोपाळकाला म्हणजेच दहिकाला हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. मुरलीधर, कान्हा, नटखट गोपाळ, नंदलाल अशा अनेक नावाने या कृष्णाला ओळखले जाते. नेमकी श्रीकृष्ण जन्माची कहाणी काय आहे, हे जाणून घेऊ…

श्रीकृष्ण जन्माची कहाणी

जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी हा उत्सव सर्व देशांत अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. गोकुळाष्टमीच्या दिवशी उपवास करून रात्री १२ वाजता किंवा रोहिणी नक्षत्राचा उदय झाला की, कृष्णजन्म करतात. तिथीनुसार श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला होता. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात. त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

गोपाळकाल्याचे महत्त्व

गोपाळकाल्यामध्ये कृष्णाला अतंत्य प्रिय असे पोहे आणि दही हे मुख्य पदार्थ असतात. विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळं एकत्र कालवून केलेला पदार्थ म्हणजे `काला’. हे सर्व पदार्थ म्हणजे शब्द, स्पर्श,रूप, रस, गंध यांचा अनुभव देणारी कर्मेंद्रिये आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण ही ज्ञानेंद्रिये यांचे ते प्रतिक मानले जाते.

श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चरायला घेऊन जाताना स्वत:ची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला. तो सर्वांसह खाल्ला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची तसेच दहीहंडी फोडण्याची सुरू झाली.

दहीकाल्यातील घटक आणि त्याचे अध्यात्मिक महत्त्व

पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्‍तीचे प्रतीक. तसेच, काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी याचे प्रतिक म्हणून त्याचे अध्यात्मिक महत्त्व असते.
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्‍तीचे प्रतीक असल्याचे मानले जाते.
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्‍तीचे प्रतीक हे दूधाला मानले जाते.
ताक : ताक हे गोपींच्या विरोधभक्‍तीचे प्रतीक मानले जात असल्याने त्याला अत्याधिक महत्त्व आहे.
लोणी : या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

दहीहंडी उत्सवात गोपाळांसह गोपिकांचा सहभाग

दहीहंडीचा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांसोबत केलेल्या असंख्य लीलांपैकी एक म्हणजे गोपिकांच्या हंड्या फोडून त्यातून लोणी चोरून खाण्याचे कृत्य हे एक आहे. त्याचेच प्रतीक म्हणून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी हंडीमध्ये दही, दूध, फळं ठेवली जातात. आजच्या युगातील गोविंदा ही हंडी फोडून मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करतात. आता तरी गोपीकाही या उत्सवात सहभाही होऊन उंचच्या उंच बांधलेल्या हंड्या फोडू लागल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here