केंद्र सरकार सुका कांदा निर्यातीवरील बंदी हटवण्याच्या तयारीत

dehydrated onion

केंद्र सरकारकडून सुक्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. कापलेला, स्लाईस स्वरूपातील तसेच भुकटीच्या रूपातला कांदा निर्यातीची बंदी उठवण्यासाठीची तयारी केंद्राने केली आहे. ग्राहक कामकाज विभागाच्या परकीय व्यापार विभागाचे महासंचालकांना पत्र लिहून सुक्या कांद्यावरील बंदी हटवण्याची मागणी केली आहे. दोन प्रकारच्या सुक्या कांद्यावरची बंदी हटवण्यासाठीची मुभा या पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

बॅंगलोर रोज आणि कृष्णपुरम ऑनियन या दोन प्रकारच्या कांद्याच्या जातींना १० हजार टनच्या निर्यातीसाठीची बंदी हटवण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात भूतान येथे १५० टन कांदा पाठवण्यात येणार असल्याचेही कळते. बॅंगलोर रोज ऑनियनची निर्यात प्रामुख्याने आशियाई देशांमध्ये होत असते. कृष्णपुरम ऑनियनचा वापर भारतीय किचनमध्ये होतो. या कांद्याच्या आकारामुळे आणि जाडीमुळे या कांद्याला थायलंड, हॉंगकॉंग, मलेशिया, श्रीलंका आणि सिंगापुरमध्ये मागणी असते.

कांद्याच्या या दोन जाती हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटच्या माध्यमातून सल्ला घेऊनच निर्यात करण्यात याव्यात असा सल्ला ग्राहक कामकाज मंत्रालयाने दिला आहे. तसेच या कांद्याची निर्यात फक्त चेन्नई बंदरावरूनच करण्यात यावी. याआधी २०१९ मध्ये चेन्नईत जी पद्धत अवलंबण्यात आली होती, त्याच पद्धतीने हा कांदा निर्यात करण्यात यावा. मालदीव येथे पाठवण्यात येणारा कांदा हा समप्रमाणात विभागला जाऊन २०२०-२१ सालापर्यंत उर्वरीत कोटा वाटप करण्यात यावा असे विभागाने स्पष्ट केले आहे. कांदा निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात घाई झाल्यानेच सध्या मंडईत कांद्याचा तुटवडा झाला आहे. याचाच परिणाम हा कांद्याची कृत्रिम टंचाई होण्यावर झाला आहे. बाजारात महागलेला कांदा याचाच परिणाम आहे.