घरदेश-विदेश२०१९ची रंगीत तालीम सुरू; ५ राज्यांमध्ये निवडणुकांची घोषणा!

२०१९ची रंगीत तालीम सुरू; ५ राज्यांमध्ये निवडणुकांची घोषणा!

Subscribe

निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधल्या निवडणुकांच्या तारखा शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांचा समावेश आहे.

२०१९मध्ये होणाऱ्या देशभरातल्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरणाऱ्या ५ राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधल्या निवडणुकांच्या तारखा शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांचा समावेश आहे. ११ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी होणार असून देशभरातील प्रमुख पक्ष आणि विशेषत: काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांसाठी या निवडणुका म्हणजे २०१९ लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्टच असणार आहेत.

आचारसंहिता लागू

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०१८मध्ये या सर्व निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. नियमानुसार या सर्व राज्यांमध्ये घोषणेपासून म्हणजेच शनिवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार आता सर्वच पक्षांनी आपापली शक्ती पणाला लावून तयारी सुरू केली आहे. या पाचही राज्यांपैकी मध्यप्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यांमधल्या निवडणुकांवर विशेष लक्ष असणार आहे.

- Advertisement -

छत्तीसगडमध्ये २ टप्प्यांमध्ये मतदान

या पाच राज्यांपैकी फक्त छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये १२ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यासाठी तर २० नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबरला तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला मतदान होणार आहे.

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त

तेलंगाणामध्ये नुकतीच विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे. तेलंगणाच्या स्थापनेनंतर पहिलीच विधानसभा कार्यकाळ पूर्ण करू शकली नाही. टीसीएसचे अध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राजीनामा दिल्यामुळे तिथले राजकीय डावपेच रंजक बनले होते. तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या ११९ असून पहिल्याच निवडणुकीत टीसीएसने ९० जागांवर विजय मिळवला होता. याशिवाय कांग्रेसने १३, MIM ७, भाजप ५, टीडीपीने ३ तर भाकपने अवघ्या एका जागेवर विजय मिळवला होता.

- Advertisement -

मध्य प्रदेशात भाजपला अँटि इन्कम्बन्सीचं आव्हान

मध्य प्रदेश हे पूर्णपणे भाजपच्या आवाक्यात असलेलं राज्य समजलं जातं. मावळत्या विधानसभेत २३१ पैकी १६५ आमदार एकट्या भाजपचेच आहेत. मात्र, कांग्रेसनेही ५७ जागा जिंकून आपलं अस्तित्व इथे कायम राखलं आहे. यंदा मात्र भाजपसमोर अँटि इन्कम्बन्सीचं आव्हान असणार आहे.

राजस्थानमध्येही भाजपची बिकट वाट

राजस्थानमध्ये आत्तापर्यंत मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलल्याचं चित्र दिसून आलं आहे. सध्याच्या विधानसभेत २०० पैकी १६० आमदार भाजपचे असून त्या आधारावर वसुंधरा राजे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. मात्र मतदारांचा नेहमीचा कल पाहाता यंदा काँग्रेसच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला कंबर कसून कामाला लागाव लागणार आहे.

छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर

२०१३साली झालेल्या निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपला ४९ जागांवर विजय मिळवता आला होता. मात्र, काँग्रेसनेही टफ फाईट देत ३९ आमदार निवडून आणले होते. त्यामुळे यंदाही ९१ आमदारांच्या विधानसभेत भाजप आणि काँग्रेस हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणूनच समजले जात आहेत.

मिझोराममध्ये काँग्रेसचा दबदबा

पूर्वांचलामधलं मिझोराम हे काँग्रेसची सत्ता असलेलं एकमेव राज्य आहे. पण असं असलं, तरी ४० सदस्यसंख्या असलेल्या मिझोराममध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. ३४ आमदारांसह काँग्रेस सध्याच्या विधानसभेतला दादा पक्ष आहे. विशेष म्हणजे भाजपकडे या विधानसभेत एकही आमदार नाही. त्यामुळे गाफील न राहाता काँग्रेसने ही निवडणूक लढवली, तर सत्ता कायम राखण्यात काँग्रेसला फारशा अडचणी येणार नसल्याचं जाणकारांचं मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -