गृह मंत्रालयाने जाहीर केली १८ दहशतवाद्यांची यादी; छोटा शकील, टायगर मेमनचा समावेश

18 terrorists
१८ दहशतवाद्यांची यादी तयार

केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दहशतवादाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने एक यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये UAPA Act अंतर्गत गृह मंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनेक साथीदारांची नावे देखील आहेत. छोटा शकील, टायगर मेमन यांचा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात हात होता. त्यांचे नाव देखील या यादीत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादाच्या विरोधात मोठी आघाडी उघडली आहे. UAPA कायद्यातंर्गत भारत सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये चार दहशतवादी तर जुलै २०२० मध्ये नऊ दहशतवाद्यांचे नाव जाहीर केले होते. आता आज नव्याने १८ जणांची नावे काढली आहेत.

UAPA म्हणजेच Unlawful Activities (Prevention) Act, 1967 या कायद्यात मोदी सरकारने ऑगस्ट २०१९ रोजी बदल केले होते. आधी या कायद्यातंर्गत केवळ संघटनांना दहशतवादी म्हणून घोषित केले जात होते. मात्र यात बदल करुन आता एका व्यक्तिला देखील दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा बदल केला आहे. आज जाहीर झालेल्या यादीत मुंबईवरील २६/११ चा हल्ला (२००८), अक्षरधाम मंदीरावरील हल्ला (२००२), संसदेवरील हल्ला (२००१) आणि १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले की, मोदी सरकारने दहशतवादाविरोधात Zero Tolerance भूमिका घेतलेली आहे. त्याच अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी आज १८ दहशतवाद्यांची यादी बनविण्यात आली आहे.

ही बघा पुर्ण यादी –

1. साजिद मीर (LeT)
2. युसूफ भट्ट (LeT)
3. अब्दुर रहमान मक्की (LeT)
4. शाहीद महमूद (LeT)
5. फरहातुल्लाह गोरी
6. अब्दुल रऊफ असगर
7. इब्राहिम अतहर
8. युसूफ अजहर
9. शाहीद लतीफ
10. मोहम्मद युसूफ शाह (हिजबुल मुजाहिद्दीन)
11. गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन)
12. जफर हुसैन भट्ट
13. रियाज इस्माइल
14. मोहम्मद इकबाल
15. छोटा शकील
16. मोहम्मद अनीस
17. टाइगर मेमन
18. जावेद चिकना