चंद्रयान – २ मधील दोन्ही रोव्हरचा शोध लागला, एका रोव्हरने जागा बदलली

Chandrayaan-2

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) मिशन चंद्रयान – २ मधील रोव्हर अजूनही चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरुप असल्याचा दावा तंत्रज्ञान विशेषज्ञाने केला आहे. त्या रोव्हरने काही मीटर अंतरही पार केल्याचं म्हटलं आहे. नासाच्या काही सॅटेलाईट फोटोंचा आधार घेत हा दावा केला आहे. ट्विट करत हा दावा केला असून त्यात अनेक फोटो शेअर केले आहेत.

२०१९ मध्ये चंद्रयान – २ नावाचं भारताचं दुसरं अंतराळ मिशन होतं. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागाजवळ पोहोचताच लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे त्यांचं निश्चित स्थान समजू शकलं नव्हतं. मात्र, शिक्षणाने मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या चेन्नईच्या शनमुगा सुब्रमण्यन या तरुण तंत्रज्ञाने ट्विटरवर नासाच्या सॅटेलाईट फोटोंच्या माध्यमातून या दोन्ही रोव्हर सापडले असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे प्रज्ञान रोव्हर लँडर विक्रमपासून काही मीटर पुढे गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

“मला माझ्या अभ्यासात चंद्रावर जे अवशेष सापडले ते विक्रम लँडरचे होते. नासाला मिळालेले अवशेष पेलोड अँटिना, रेट्रो ब्रेकिंग इंजिन, सोलर पॅनल इत्यादी असू शकतं. रोव्हरचं लँडर मोडलेल्या स्थितीत आहे आणि ते जमिनीपासून काही अंतरावर आहे. रोव्हरचा शोध घेणं तसं अवघड काम होतं. कारण रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होतं. या ठिकाणी नेहमीच प्रकाश नसतो. त्यामुळे हे अवशेष ११ नोव्हेंबरला नासाला सापडले नाहीत,” असं शनमुगा सुब्रमण्यनने ट्विटमध्ये म्हटलं आहे.