चांद्रयान-३: भारताचे यान पुन्हा चंद्राच्या दिशेने झेपावणार

२०२१ च्या सुरुवातीला चांद्रयान-३ मोहिम लाँच होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा भारताचे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे.

Chandrayaan-3 launch likely in early 2021

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून अवकाश कार्यक्रमाला सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. या कोरोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान-३ मोहिमेला विलंब झाला होता. मात्र, आता २०२१ च्या सुरुवातीला चांद्रयान-३ मोहिम लाँच होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा भारताचे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे.

‘२०२१ या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने झेपावण्याची शक्यता आहे. तसेच चांद्रयान-३ची चांद्रयान-२ सारखीच मोहिम असेल. चांद्रयान-२ प्रमाणे चांद्रयान-३च्या मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण, ऑर्बिटर नसेल’ केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली आहे.

सध्या चांद्रयान-२ चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे. या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे. दरम्यान, मागच्यावर्षी २०२० मध्ये चांद्रयान तीन मोहिम लाँच होईल अशी माहिती मंत्र्यांनी दिली होती. गेल्यावर्षी सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्रावर कोसळल्यानंतर इस्रोने चांद्रयान-३ ची घोषणा केली होती.

चांद्रयान-३ची जाधवपूर विद्यापीठाकडे जबाबदारी

जाधवपूर विद्यापीठाकडे चांद्रयान-३ ची जबाबदारी देण्यात आली आहे. या विद्यापीठाचे दोन संशोधक इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेत चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करण्याचा भारताचा संकल्प आहे. आतापर्यंतच्या चंद्र मोहिमांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा कोणीही अभ्यास केलेला नाही.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार; जाधवपूर विद्यापीठाचे दोन संशोधक सयान चॅटर्जी, डॉ. अमितवा गुप्ता इस्त्रोसोबत चंद्रावरील लँडिंगच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. तर चंद्रावरील प्रत्यक्ष लँडिंगच्यावेळी कशी स्थिती असेल तो विचार करुन सिम्युलेशन मॉडेलवर ते काम करत आहेत.

‘लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लँडिंग न होता, पंखाप्रमाणे सॉफ्ट लँडिंग कसे होईल. त्यावर काम सुरु आहे’, असे सयान चॅटर्जी यांनी सांगितले. ते इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन सहाय्यक प्राध्यापक आहेत.


हेही वाचा – PUBG Ban : पब्जी खेळायला मिळत नाही म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या