देशभरातील ऑर्किटेक्चर अभ्यासक्रमात होणार बदल

देशभरातील आर्किटेक्चर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाचे तंत्र अवगत करतानाच व्यावसायिक अनुभवदेखील मिळणार आहेत. तशा प्रकारचा आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने (एआयसीटीई) घेतला आहे.

Mumbai

 देशभरातील आर्किटेक्चर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाचे तंत्र अवगत करतानाच व्यावसायिक अनुभवदेखील मिळणार आहेत. तशा प्रकारचा आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने (एआयसीटीई) घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अंतिम मान्यतेसाठी तो केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. एआयसीटीईच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.

आर्किटेक्चर विभागातील पदवी संपादन केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काम करताना अनेक अडचणी येत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या अभ्यासक्रमात बदल करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर नुकत्याच एआयसीटीईच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक मुकुंद गोडबोले यांनी एक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार व्यवसायातील खाचखळगे, तांत्रिक बाबी, कायदेशीर माहिती, विश्लेषणात्मक गोष्टी, इतर कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास आदींचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात असेल. पहिल्या वर्षी शिकत असताना विद्यार्थ्यांनी मेंटॉर म्हणून व्यावसायिक संस्थांची निवड केली जाणार आहे.त्याचबरोबर त्या त्या संस्थेबरोबर अनुभव घेत असताना त्यांच्या मार्गदर्शन देखील मिळणार आहे. तसेच या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त या विषयातील अभ्यासक्रमांंसमवेत होणारी चर्चासत्रे व पर्यायी विषयांचा अभ्यास करण्याची संधीदेखील यातून मिळेल. पाच वर्षांत हे साध्य केल्यानंतर त्यांच्यात विशेष कुशलता व प्राविण्य संपादन होऊ शकेल. त्याशिवाय, आर्किटेक्चर व नगर नियोजन कॉलेजांसमवेत इतर विद्यापीठे यांच्यात अन्य विषयांच्या अभ्यासक्रमांबाबतदेखील संयुक्तपणे माहितींचे आदान-प्रदान होऊ शकणार आहे.

दरम्यान, या प्रस्तावाबद्दल गोडबोले यांनी या विषयावर सविस्तरपणे चर्चा केल्यानंतर, कौशल्य विकासाचे महत्व व त्याबाबतच्या उपाययोजना याची माहिती संचालक मंडळाला दिली. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यानंतर अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊन त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी ते उपयुक्त ठरेल, असल्याने हा प्रस्ताव आपण सादर केला असल्याचे मत गोडबोले यांनी यावेळी सांगितले.