चीनी चाल; भारतीय सैनिकांवर दबाव टाकण्यासाठी सीमेवर पंजाबी गाणी वाजवतायेत

army at indian border
प्रातिनिधिक छायाचित्र

भारत आणि चीनमधील LAC सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. चर्चेच्या अनेक बैठका विफल ठरल्या असल्या तरी भारताकडून शांततेच्या मार्गाने सीमाप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र चीन नव्या नव्या चाली खेळून भारत आणि भारतीय सैनिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अशा तणावपूर्ण परिस्थितीत चीनने आता फिंगर ४ क्षेत्रात लाऊडस्पीकर बसवले असून त्यावर पंजाबी गाणी लावली जात आहेत. या भागात भारतीय सैनिक गस्तीसाठी तैनात आहेत. ज्यामध्ये मोठ्या संख्येने पंजाबी सैनिक आहेत. या सैनिकांचे चित्त विचलित करण्यासाठी चीनने हे कुटील कारस्थान रचल्याचे सांगितले जात आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फिंगर ४ क्षेत्रावर २४ तास भारतीय सैनिक गस्तीवर असतात. या सैनिकांचे लक्ष विचलित करुन त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत आहे. फिंगर ४ क्षेत्रात भारत आणि चीनमध्ये ठिणगी पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी याच भागात दोन्ही बाजूकडील सैन्यांनी एकमेकांवर गोळीबार केला होता. दोन्ही बाजूंनी १०० हून अधिक राऊंड फायर केले होते. मागच्या काही दिवसांत पुर्व लडाख क्षेत्रात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तीन वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

भारतीय सेनेतील सुत्रांनी सांगितले की, २९-३१ ऑगस्ट दरम्यान दक्षिणेकडील पँगॉग तलावाजवळच्या टेकड्यावर चीन ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आपल्या सैनिकांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी मुखापरी येथे तर ८ सप्टेंबर रोजी पँगॉग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ भारत-चीनी सैनिकांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या.