चिनी सैन्याची अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत जमवाजमव

गलवान प्रांत आणि पॅगाँगमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय लष्कराकडून चांगलाच मार खाल्ला असतानाही चिन्यांची आगळीक काही थांबलेली नाही. आता चिनी लष्कराने अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्यही हायअलर्टवर असून चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला तर त्यांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी भारतीय सैनिकांनी केली आहे.

चिनी सैनिकांनी गलवान प्रांतात घुसखोरी केली होती. त्यावेळी भारतीय सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत भारताचे २२ सैनिक शहीद झाले होते. यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यात किमान ६० चिनी सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. या चकमकीत किती चिनी सैनिक ठार झाले हे चीनने अद्याप उघड केलेले नाही. त्यावरून चीनची मोठी मनुष्यहानी झाली असल्याचे मानले जाते.

गलवान प्रांतात भारतीय लष्कराने पाणी पाजल्यानंतरही चिनी सैनिक सुधारले नाहीत. त्यांनी दोन आठवड्यापूर्वी पॅगाँग प्रांतात घुसखोरी केली. मात्र, यावेळी भारतीय सैनिक सावध होते. त्यांनी चिनी सैन्याला असे काही मागे सारले की, पॅगाँग प्रांतात अनेक उंच भागांवर भारतीय लष्कराने कब्जा केला. या दुसर्‍या हल्ल्यातून चीन अद्याप सावरलेला नाही. भारतासोबत शांतता कराराच्या भाषा करायची आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत आगळीक करायची, ही चीनची जुनी खोटी अद्यापही काय आहे.

आता चीनने अरुणाचल प्रदेशजवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या टूटिंग, चांग ज आणि फिशटेल २ या भागांत चिनी सैन्य मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सीमेलगत असलेले हे भाग भारतीय सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहेत. चीनचे सैन्य भारतात घुसखोरीचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर हाय अलर्टवर आहे.

चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणतीही कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णतः सतर्क आणि सजग आहे. चिनी सैन्याने जमवाजमव सुरू केल्याने भारतीय लष्करही हाय अलर्टवर आहे. तसेच नियंत्रण रेषेजवळ लष्कराचे सैनिक वाढवण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे डोकलाम या ठिकाणी चिनी सैन्य तैनात झाले होते आणि भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढला होता. अगदी त्याप्रकारे मागील सहा महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढलेला आहे. लडाखच्या गलवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये जो संघर्ष झाला होता त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर चीन आणि भारत या दोन्ही देशांचे परस्पर संबंध तणावाचे झाले. हा तणाव अजूनही कायम आहे.