राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरेंसह १० हजार भारतीयांवर चीनचा वॉच

China watching President, PM, cji, CMs,

भारत आणि चीनमधील लडाख सीमेवर यूद्धजन्य परिसिथिती निर्माण झाली असताना देखील चीन कुरघोड्या करत आहे. दरम्यान, चीनची कुरघोडी समोर आली आहे. चीन कंपन्याच्या मदतीने भारतात हेरगिरी करत असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान, राष्ट्रपतींपासून हजारो भारतीयांची चीन हेरगिरी करत असल्याचा दावा इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश शरद बोबडे, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते तसंच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर चीनस्थित एक मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवत आहे. चीनच्या आतापर्यंतच्या कायापालटात आणि ‘हायब्रीड वॉरफेर’मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारी ‘झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड’ ही कंपनी हेरगिरी करत आहे. ही कंपनी चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे. या कंपनीचे मुख्यालय शेन्झेन शहरात आहे. ही कंपनी महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांची हेरगिरी करत नसून अनेक राजकीय संस्था आणि उद्योगांवरही नजर ठेवून आहे. राजकारण ते उद्योग आणि न्यायव्यवस्था ते माध्यमं या यंत्रणांवरही ही कंपनी हेरगिरी करीत आहे. यासह भारतातील सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे.

संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह १५ माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दलप्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू यांच्यावरही ही कंपनी नजर ठेवून आहे. उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह ‘भारत पे’ App चे संस्थापक निपुण मेहरा आणि ‘अर्थब्रिज’चे अजय त्रेहान आदी उद्योगपती हेरगिरीचे लक्ष्य आहेत. देशातील महत्त्वाच्या पदांवरील अधिकारीवर्ग, न्यायमूर्ती, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, पत्रकार, कलाकार, खेळाडू, आध्यात्मिक गुरू आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरही ‘झेनुआ’ कंपनीची नजर आहे. त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि अंमली पदार्थ, सोने किंवा वन्य प्राण्यांच्या तस्करीतील गुन्हेगारांच्या हालचालींवर कंपनीचं लक्ष्य आहे. विशेष म्हणजे ‘झेनुआ’ कंपनीने आपण चिनी गुप्तचर, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांबरोबर काम करीत असल्याचा दावा केला आहे.

यांच्यावर नजर

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबीय

विविध राज्यांचे मुख्यमंत्री: महाराष्ट्र – उद्धव ठाकरे, पंजाब-अमरिंदर सिंग, ओदिशा- नवीन पटनायक, पश्चिम बंगाल- ममता बॅनर्जी, राजस्थान- अशोक गेहलोत, मध्य प्रदेश -शिवराज सिंह चौहान.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, पीयूष गोयल

चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल

सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

हिंदू समूहाचे अध्यक्ष एन. रवी

झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी

इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई

पंतप्रधान कार्यालयातील माजी माध्यम सल्लागार संजय बारू

दि इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य संपादक राज कमल झा