घरदेश-विदेशसोनिया गांधींसोबत सत्तास्थापनेची चर्चा नाही

सोनिया गांधींसोबत सत्तास्थापनेची चर्चा नाही

Subscribe

पवारांकडून सस्पेन्स; सेनेला टेन्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील महाशिवआघाडीबाबत अंतिम निर्णय होण्याची चर्चा असताना, सरकार स्थापनेबाबत सोनिया गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा झालीच नाही, असे सांगत पवार यांनी राज्यातील सरकार स्थापनेचा सस्पेन्स कायम ठेवला.
सोनिया गांधी यांच्यासोबत फक्त राज्यातील राजकीय परिस्थिती, आघाडीच्या मित्रपक्षांचे संख्याबळ आणि इतर बाबींवर चर्चा झाली. शिवसेनेसोबत महाआघाडीबाबत काही ठरलेले नाही, असे शरद पवार यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आघाडीतील इतर लहान मित्रपक्षांनाही आम्ही नाराज करून शकत नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच शिवसेनेसोबत सरकार स्थापनेचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात कोणताही राजकीय पक्ष सरकार स्थापू न शकल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत वेगळी चूल मांडली आहे.

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी रात्री उशिरा शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट असून ओल्या दुष्काळाबाबत बळीराजाला जास्तीतजास्त मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले. तसेच राज्यात लवकरच शिवसेनाच स्थिर सरकार देईल याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेसाठी बैठका सुरू आहेत. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्याचा मसुदा तयार असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या अंतिम निर्णयानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर सोमवारी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. बैठकीत महाशिवआघाडीचे पक्के झाले, असा कयास मांडण्यात येत होता. पण शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तो फोल ठरवला. सोनिया गांधी यांच्याशी सत्ता स्थापनेबाबत तसेच शिवसेनेसोबतच्या महाआघाडीबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि घडामोडींवर चर्चा झाली. बैठकीत काँग्रेस नेते ए. के. अँटोनीदेखील उपस्थित होते, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची चर्चा झालीच नाही, असा दावाही शरद पवार यांनी केला. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यावरून आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. समाजवादी पक्षाचाही विरोध आहे. त्याबाबत भाष्य करताना पवार म्हणाले की, ते आमचे मित्र पक्ष आहेत. त्यांच्यासोबत आम्ही निवडणूक लढवली होती. त्यांना नाराज करू शकत नाही. त्यामुळे राजू शेट्टी, समाजवादी पक्षाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेनेच्या एकत्र येण्याबद्दल मी काय बोलणार, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

- Advertisement -

आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्यांचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, शिवसेनेने १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा, असे शरद पवार म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत, असा दावा शिवसेना करतेय, या प्रश्नावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत, असे सांगितल्याने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. किमान समान कार्यक्रमाबाबत पवार म्हणाले की, काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी किमान समान कार्यक्रम तयार करू, राज्यातील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी विधानसबा सदस्य म्हणून ते भेटले होते, असा दावा पवार यांनी केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -