शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नीप्रेमावर काँग्रेस नाराज

Mumbai
लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचा केला प्रचार

भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम यांनी नुकताच समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. यानंतर समजावादी पक्षाने त्यांना लखनऊमधून उमेदवारी दिली. पूनम सिन्हा यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शत्रुघ्न सिन्हादेखील त्यांच्यासोबत होते.

ही गोष्ट लखनऊमधील काँग्रेसचे उमेदवार प्रमोद कृष्णन यांना चांगलीच खटकली. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा असला तरी कुटुंबातील सदस्यांना पाठिंबा देणे माझे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. शत्रुघ्न सिन्हा यांच्या या पक्षविरोधी भूमिकेमुळे आता काँग्रेसची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे प्रमोद कृष्णन यांनीही शत्रुघ्न सिन्हांना पक्षधर्माची आठवण करून दिली . शत्रुघ्न सिन्हा यांनी लखनऊमध्ये येऊन पतीधर्माचे पालन केले. मात्र, आता त्यांनी एक दिवस तरी माझ्या प्रचारासाठी येऊन पक्षधर्माचे पालनही करावे, असे कृष्णन यांनी सांगितले. यावर आता शत्रुघ्न सिन्हा काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असली तरी त्यांच्या बंडखोर स्वभावामुळे काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

देशातील प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक असलेल्या लखनऊमध्ये चार लाख कायस्थ, साडेतीन लाख मुस्लीम आणि १.३ लाख सिंधी मतदार आहेत. पुनम सिन्हा या सिंधी आहेत तर त्यांचे पती शत्रुघ्न सिन्हा हे कायस्थ आहेत. त्यामुळे पुनम सिन्हा राजनाथ सिंह यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण करू शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here