घरदेश-विदेशराजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा विजय

राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Subscribe

रानी तेरी खैर नही, मोदी तुझसे बैर नही

मागील २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १६३ जागा मिळून सत्तेत आलेल्या भाजपला यावेळी मात्र राजस्थान गमवावे लागले. येथे काँग्रेसला १०४ जागा मिळाल्या असून भाजपला ७४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुजन समाज पक्षाला राजस्थानमध्ये ३ जागा मिळाल्या आहेत. तर २० जागांवर अपक्ष निवडून आले आहेत.

२०१३ च्या निवडणुकीत भाजपने १६३ जागा जिंकत काँग्रेसचे पानीपत केले होते. त्यावेळी काँग्रेसला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. राजस्थानी मतदारांचा तेव्हाचा कल पाहता भाजप पुढची दहा वर्षे तरी सत्तेवर राहील, असा अंदाज होता. पण मतदारांनी तो फोल ठरवला. यावेळी भाजपने ८० पेक्षा जास्त विद्यमान आमदारांना आणि चार मंत्र्यांना तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली.

- Advertisement -

या बंडखोरीचा मोठा फटका भाजपला बसल्याचे सांगितले जाते. दुसरे म्हणजे राजस्थानच्या ग्रामीण भागात विकास झालाच नाही. त्यातच मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयी जनतेत मोठा असंतोष होता. ‘मोदी तुझसे बैर नही, रानी तेरी खैर नही,’ अशा घोषणा येथील मतदारच देत होता. त्यामुळे यावेळी वसुंधरा राजेंना ही निवडणूक जड जाणार हे अगोदर निश्चित झाले होते.

राजस्थानमधील हिंदूंनी आणि मुस्लिमांनीही भाजपला नाकारल्याचे दिसून आले आहे. भाजपने आपल्या उमेदवारांच्या यादीत एकाही मुस्लिमाला स्थान दिलेले नव्हते. पण अखेरच्या क्षणी विद्यमान परिवहन मंत्री युनुस खान यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे संभाव्य मुख्यमंत्री सचिन पायलट यांना आव्हान देण्यासाठी युनुस खान यांना उभे करण्यात आले, पण त्यांचाही पराभव झाला. मात्र या निवडणुकीवरून लोकसभेच्या आगामी निवडणुकीचा अंदाज बांधणे कठिण आहे. कारण ‘रानी तेरी खैर नही’ म्हणणार्‍या राजस्थानवासीयांनी ‘मोदी तुझसे बैर नही’ असे आश्वासनही दिलेले आहे.

- Advertisement -

राजस्थानमधील जनतेने भाजपच्याविरोधात मतदान केले आहे. भाजपने हे समजले पाहिजे की आता देशातील जनता त्यांच्याविरोधात जात आहे. काँग्रेसला राजस्थानमध्ये मिळालेल्या जागा या खूप मोठ्या आहेत. तर भाजप १६३ जागांवरून खाली आली आहे. हा विजय राजस्थानच्या जनतेचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे.
-सचिन पायलट, अध्यक्ष, राजस्थान प्रदेश काँग्रेस समिती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -