घरदेश-विदेशकर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार गडगडले, विश्वासदर्शक ठराव हरले!

कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार गडगडले, विश्वासदर्शक ठराव हरले!

Subscribe

गेल्या जवळपास महिन्याभरापासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या कानडी राजकीय नाट्यावर अखेर मंगळवारी पडदा पडला. गेल्या आठवड्याभरापासून लांबवला जात असलेला बहुमताचा ठराव अखेर मंगळवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मांडला. मात्र, त्यामध्ये ९९ विरूद्ध १०५ अशा फरकाने काँग्रेस-जनता दलाचं सरकार अखेर पडलं. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये काय होईल? राज्यपाल कुणाला सत्ता स्थापना करण्यासाठी बोलावणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली असून भाजप हा स्वाभाविक पर्याय दिसत असल्याचं बोललं जात आहे. सध्याचं कर्नाटक विधानसभेतलं संख्याबळ पाहाता भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे येडीयुरप्पा यांचं सरकार कर्नाटकमध्ये सत्तेत येणार, हे स्पष्ट मानलं जात आहे.

- Advertisement -

कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन्ही पक्षांमधल्या एकूण १५ आमदारांनी राजीनामा देऊन मुंबई गाठल्यानंतर या सर्व राजकीय नाट्याला सुरुवात झाली. त्यानंतर या आमदारांच्य मनधरणीचे अनेक प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आले. कर्नाटक काँग्रेसचे ट्रबलशूटर शिवकुमार यांनीही यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्यामध्ये त्यांना अपयश आलं. या सर्व आमदारांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहात राजीनामा मागे घ्यायला नकार दिला. होता. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर न्यायालयानं अखेर कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनाच प्रतिवादी केल्यामुळे मंगळवारी कोणत्याही परिस्थितीत विश्वासदर्शक ठराव प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं. त्यानुसार आज घेण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये कुमारस्वामींचं सरकार पडलं असून आता राज्यपाल वजुभाई वाला भाजपला संख्याबळाच्या आधारावर सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – कर्नाटक विधानसभेत कानडी शिमगा!

विश्वासदर्शक ठराव लांबवण्याचे प्रयत्न व्यर्थ

दरम्यान, २० महिन्यांपूर्वी पुरेसं संख्याबळ नसूनही आणि भाजपकडे पूर्ण संख्याबळ असून देखील काँग्रेसने जनता दल सेक्युलरसोबत आघाडी करून कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली. तेव्हापासूनच सरकार गडगडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर दोन्ही पश्रांमधल्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर हे नाट्य खऱ्या अर्थानं सुरू झालं. या आमदारांना भाजपनंच राजीनामा द्यायला लावल्याचे आणि त्यासाठी आमिषं दिल्याचेही आरोप यादरम्यान केले गेले. मात्र, त्याचे सबळ पुरावे काँग्रेसला सादर करता आले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेसकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. वेळकाढूपणा केला जात होता. विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी देखील कधी नियमांचं कारण देत, कधी संख्याबळाचं कारण देत तर कधी राजीनाम्यांच्या योग्य नमुन्याचं कारण देत या ठरावाला विलंब केला होता. मात्र अखेर बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयातच धाव घेतल्यानंतर विश्वासदर्शक ठराव घ्यावाच लागला.

- Advertisement -

कर्नाटकमध्येही ऑपरेशन लोटस!

दरम्यान, भाजपने गोव्याप्रमाणेच कर्नाटकमध्ये देखील ऑपरेशन लोटस राबवून तिथलं सरकार पाडल्याचं आता बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता येत्या काळात राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये देखील अशाच प्रकारे संख्याबळाच्या गणितावर काँग्रेसची विद्यमान सरकारं पाडण्याचे देखील प्रयत्न होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

कर्नाटक विधानसभेची सद्य परिस्थिती

भाजप – १०५

काँग्रेस-जदसे – ९९

बंडखोर – १६

अपक्ष – १

बहुमतासाठी आवश्यक – १०५

फडणवीस-लाड यांच्या फिल्ड लढाईने यश

कर्नाटकात भाजपच्या येडियुरप्पांनी शतक झळकावले असले तरी त्यामागील फटकेबाजी अमित शहा यांच्या गुरुमंत्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच होती. आशिष शेलार यांना जोडीला घेऊन आधी मुख्यमंत्र्यांनी पवईच्या रेनिसन्समधून या कर’नाटक’ डावाला सुरुवात केली होती. मात्र शेलार यांच्या दमछाकीमुळे डाव हातातून जाईल हे लक्षात आल्यावर फडणवीस यांनी नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज बदलावा अशी सूचना खुद्द शहा यांनी केली. त्यानंतर ’बिझनेस’ फंड्यासाठी परिचित असलेले विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी सूत्रे सोपविली. त्यांनी व्यापाराचे शास्त्र माहित असलेल्या मोहित कंबोज यांना जोडीला घेऊन मुंबई,गोवा आणि दिल्ली अशा तीन ठिकाणी फटकेबाजी करत या शतकी खेळीचा डाव उभारला. कर्नाटकातील हे बंडखोर आमदार प्रामुख्याने सीमाभाग आणि बंगळुरूमधील होते. त्यासाठीच फडणवीस यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. लाड-कंबोज यांच्या फिल्डवरील खेळीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे राष्ट्रीय स्तरावरील वजन वाढण्यास मदत झाली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी येडियुरप्पा यांच्या आधी फडणवीस यांना फोन करुन शाबासकी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -