कमी शासन, जास्तीत जास्त खासगीकरण हेच मोदी सरकारचं धोरण – राहुल गांधी

congress mp rahul gandhi criticized pm narendra modi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या निर्णयांवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकार करत असलेल्या खासगीकरणावर सडकून टीका केली आहे. कमी शासन, जास्तीत जास्त खासगीकरण हेच मोदी सरकारचं धोरण आहे, असा घणाघात राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधींनी ट्विट करत केंद्रावर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारचा विचार कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण असा आहे. कोविड फक्त निमित्त आहे. मोदी सरकारला सरकारी कार्यालयांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांपासून मुक्त करायचं आहे. त्यांना युवकांचं भविष्य खराब करुन आपल्या मित्रांनाच पुढे न्यायचं आहे,” असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. कोरोनाचे संकट पाहता सरकारने नवीन सरकारी नोकऱ्यांची भरती करण्यास बंदी घातली आहे. ययावरुन राहुल गांधींनी टीका केली आहे.

मोदींची ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था गायब

याआधी राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. “देशात १२ कोटी रोजगार गायब, ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था गायब, सर्वसामान्यांचे उत्पन्न गायब, देशाची समृद्धी आणि सुरक्षा गायब, आपण एखादा प्रश्न विचारल्यास उत्तर गायब,” असं राहुल गांधी म्हणाले. नोटबंदीचा फायदा फक्त श्रीमंतांना झाला. घरातून तुमचे पैसे काढून ते वापरुन श्रीमंतांचे कर्ज माफ केलं गेलं, असा घणाघात राहुल गांधींनी केला.