२१ दिवसात कोरोना संपवणाऱ्यांनी लाखो रोजगार संपवले; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

congress mp rahul gandhi criticized pm narendra modi
Advertisement

देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर त्याचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या अनियोजित लॉकडाऊनचा फटका सर्वांना बसला. देशाची अर्थव्यवस्था कोसळली. नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन करताना २१ दिवसांत कोरोनाला नष्ट करु असं आश्वासन दिलं होतं. यावरुन आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी टीका केली आहे. “अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन कामगारांसाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला,”अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली.

राहुल गांधी सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर सातत्याने बोलत आहेत. व्हिडीओ सीरिजच्या माध्यमातून केंद्राच्या चूका दाखवत आहेत. राहुल गांधी यांनी ‘लॉकडाऊन की बात’ कार्यक्रमातून मोदी सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर टीका केली आहे. “अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटित क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. वचन दिलं होत २१ दिवसांत कोरोना संपवण्याचं, पण संपवण्यात आले कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग,” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

कोरोनाच्या नावाखाली जे काही केंद्र सरकारने केलं ते असंघटीत क्षेत्रावर तिसरं आक्रमण होतं. सुक्ष्म आणि मध्यम उद्योग चालवणाऱ्यांना कोणतीही सूचना न देता लॉकडाउन केल्यानंतर फटका बसला. पंतप्रधानांनी कोरोनाविरुद्धची लढाई ही २१ दिवसांची असेल, असं सांगितलं. मात्र, असंघटित क्षेत्राचा मणकाच २१ दिवसात तुटला. या काळात काँग्रेसने एकदा नाही, तर अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी. थेट बँक खात्यात पैसे जमा करावेत. पण तसं काहीच केलं नाही. सुक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी पॅकेज तयार करा. त्यांना वाचवण्याची गरज आहे, असं काँग्रेसने सांगितलं होतं. मात्र, सरकारने काहीच केलं नाही. उलट केंद्राने सर्वात श्रीमंत लोकांचा लाखो करोडो रुपयांचा टॅक्स भरला. लॉकडाऊन करोनावर आक्रमण नव्हतं. तर ते देशातील गरिबांवरील आक्रमण होतं. युवकांच्या भविष्यावर आक्रमण होतं. मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आक्रमण होतं. आपल्या असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण होतं. आपल्याला हे आक्रमण समजून घ्यावं लागेल आणि या आक्रमणाविरोधात उभं राहावं लागेल,” असं आवाहन राहुल गांधी यांनी देशवासियांना केलं.