मोदींच्या सूट-बूटवाल्या मित्रांसाठीच नोटबंदी – राहुल गांधी

नोटबंदीच्या निर्णयाला २ वर्ष पूर्ण होत असतानाच विरोधकांकडून रिझर्व्ह बँकेकजून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीचं भांडवल केलं जात आहे. अपयशी ठरलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

New Delhi
rahul gandh
फाईल फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बरोबर २ वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरून आता भाजप आणि मोदींवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला काय मिळालं? यासंदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारनुसार नोटबंदीनंतर देशातल्या १००० आणि ५०० रुपयांच्या चलनातल्या तब्बल ९९.३० टक्के नोटा बँकांमध्ये पुन्हा भरण्यात आल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने अगदीच नगण्य रक्कम ही काळा पैसा म्हणून समोर आली. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांनी मोदींवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आघाडीवर आहे. गुरुवारी दिवसभर काँग्रेसच्या इतर राष्ट्रीय नेत्यांनी नोटबंदीवर टीका केल्यानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून टा निर्णयाचा समाचार घेतला आहे.


एकदा बघा आणि मग ठरवा – पाहा मोदींचा नोटबंदीचा दावा कसा ठरला फोल!


विरोधकांनी नोटबंदीचा घेतला समाचार

गुरुवारी ८ नोव्हेंबरला नोटबंदीच्या निर्णयाला २ वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदींच्या नोटबंदीच्या फसलेल्या निर्णयाचं चांगलंच भांडवल केलं. राहुल गांधींनी तर ट्विटरवर ‘नोटबंदी हे एक षड्यंत्र होतं’ असं म्हणत खळबळजनक आरोप केला आहे. ‘देशात लागू केलेली नोटबंदी हा पूर्णपणे विचारपूर्वक केलेला एक गंभीर घोटाळा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटा-बुटातल्या मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीची एक धूर्त स्कीम होती’, असा थेट आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. शिवाय, ‘या षड्यंत्रामध्ये काहीही निरागस नव्हतं, त्याचा कोणताही दुसरा अर्थ काढणं हा देशाच्या जाणतेपणाचा अपमान करण्यासारखं आहे’, अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला.

काय घडलं ८ नोव्हेंबर २०१६ला?

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १००० आणि ५०० रुपयांच्या सर्व चलनी नोटा रद्दबातल ठरवल्या होत्या. त्या मध्यरात्रीपासूनच हा निर्णय अंमलात आणण्यात आला होता. तसेच, पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या नाहीत, तर त्यांचं काहीही मोल राहणार नाही, असंही जाहीर केलं होतं. त्यामुळे पुढचे काही दिवस बँकांसमोर लागलेल्या अभूतपूर्व रांगांमुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. त्याचप्रमाणे एटीएममध्ये नव्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यातही विलंब लागल्यामुळे मोठा मनस्ताप झाला. हे सर्व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि कॅशलेस व्यवहारांसाठी केल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निर्णयासंदर्भात रिझर्व्ह बँकेला देखील काही माहिती नव्हतं, असं नंतर सांगितलं गेलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here