सोनिया गांधी यांनी बोलावली सल्लागांराची बैठक; पक्षांतर्गत खदखदीवर चर्चा?

Congress president sonia gandhi called a meeting of advisory committee

बिहार विधानसभा निवडणूक आणि देशातील इतर राज्यांमधील पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेस नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सल्लागांराची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी ५ वाजता व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे सल्लागारांची बैठक होणार आहे. बिहार पराभवानंतर राजद नेत्यांपाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र डागले आहे. काँग्रेस पक्षात अंतर्गत खदखद सुरु असताना सोनिया गांधी यांनी बोलावली सल्लागांराची बैठक बोलावली आहे. मात्र, ही बैठक नेमकी कशासाठी बोलावली आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.

काँग्रेसने महत्वाच्या विषयांवर सल्ला देण्यासाठी ऑगस्टमध्ये एक विशेष सल्लागार समिती गठित केली होती. या समितीच्या सदस्यांमध्ये रणदीप सुरजेवाला, अहमद पटेल, एके अँटनी, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक यांचा समावेश आहे. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार असलेले अहमद पटेल सध्या आजारी असल्यामुळे रूग्णालयात दाखल आहेत. असे असून देखील या बैठकीला बोलवल्यानंतर काँग्रेसमध्ये कोणते नवीन वादळ येणार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी यांना पक्षाच्या सुधारणेसाठी पत्र लिहिलेल्या २३ काँग्रेस नेत्यांपैकी एक कपिल सिब्बल यांनी पराभवाचा नव्याने आढावा घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर ते काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत ते दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यापर्यंत अनेक काँग्रेस नेते प्रश्न उपस्थित करण्यावरुन सिब्बल यांना लक्ष्य करीत आहेत. या दरम्यान, सोनिया गांधी यांच्या सल्लागार समितीच्या बैठकीबाबत अनेक तर्क वर्तवले जात आहेत.

बिहार पराभवावरुन काँग्रेसवर आरोप

बिहारमधील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवासाठी काँग्रेसला दोष देण्यात येत आहे. महागठबंधनमधील RJD आणि डाव्या पक्षांचा विजयी होण्याचा दर ५० टक्क्यांहून अधिक होता, तर काँग्रेस ७० जागांपैकी केवळ १९ जागा जिंकू शकली. त्याचबरोबर, आरजेडी नेत्यांनीही बिहार निवडणुकीबाबत काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थि केले आहेत.

आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर आरोप केला की जेव्हा निवडणूक शिगेला पोहोचली होती तेव्हा राहुल गांधी बहीण प्रियंकासमवेत शिमला येथील त्यांच्या घरी पिकनिक साजरी करत होते. ते म्हणाले की प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या बड्या नेत्यांनीही बिहारच्या निवडणूक प्रचाराकडे दुर्लक्ष केले.