CoronaVirus : सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र!

देशातील करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला करोनाविरोधातील लढ्यात विरोधकांचा पूर्ण पाठिंबा आहे असं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे.

sonia gandhi

देशभरात करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी ‘करोनाविरोधातल्या लढ्यासाठी काँग्रेस पूर्णपणे सरकारच्या पाठिशी आहे, सरकारच्या उपाययोजनांना काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा असेल’, असं म्हटलं आहे. त्याशिवाय, ‘आजच्या या संकटाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पक्षीय हितसंबंध बाजूला ठेऊन मानवतेसाठी आणि आपल्या देशासाठी एकत्र येणं आवश्यक आहे’, असं देखील त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

देशाला करोनाचा विळखा

आत्तापर्यंत देशभरात ६४९ रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये १२६ रुग्ण एकटया महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे
देशात करोनाचा वाढता फैलाव हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासियांशी संवाद साधताना देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, यादरम्यान जीवनावश्यक सेवा सुरूच राहतील, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

पत्रामधून सोनिया गांधींची पंतप्रधानांना विनंती

दरम्यान, या पत्रामध्ये सोनिया गांधींनी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. पुढील काही काळासाठी देशभरातील कर्जांच्या इएमआयची वसुली शिथिल करण्यात यावी, तसेच, डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना एन-९५ मास्कचं वाटप करण्यात यावं, अशी मागणी देखील केली आहे. याशिवाय, भविष्यात सर्वात जास्त शक्यता ज्या भागात करोनाच्या फैलावाची आहे, त्या भागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम करून तिथे आयसीयू आणि करोनाच्या वॉर्डची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी देखील विनंती सोनिया गांधींनी या पत्रात केली आहे.


CoronaVirus : ‘चीनी व्हायरस’ टीकेवर चीननं दिलं प्रत्युत्तर!