घरCORONA UPDATEBreastfeeding : मातांनो, कोरोनाबाधित झालात, तरी बाळाला दूध पाजणं सोडू नका!

Breastfeeding : मातांनो, कोरोनाबाधित झालात, तरी बाळाला दूध पाजणं सोडू नका!

Subscribe

देशात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर आता कोरोनासोबतच जगायचे विविध मार्ग लोकांनी शोधून काढले आहेत. मात्र, कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या बाळांना दूध पाजणं महिला सोडत असल्याचं समोर आलं होतं. दूध पाजताना बाळाला देखील आपल्याकडून कोरोनाची लागण होऊ शकेल, या भितीपोटी या महिलांनी बाळाला दूध पाजणं सोडल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता अशा मातांसाठी केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाकडून मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली असून कोरोनाबाधित असाल किंवा झालात तरी आपल्या बाळाला दूध पाजणं सोडू नका, त्यातून कोरोनाचा संसर्ग होत नाही, असं विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या बाळांना दूध कसं पाजायचं, अशा विवंचनेत असलेल्या मातांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

काय सांगितलंय विभागानं?

कोरोनाची लागण झालेल्या मातांची बाळांना दूध पाजण्यावरून (Breastfeeding) होणारी चिंता ओळखून केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाने (Women and Child Development Ministry) त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आईचं दूध बाळाच्या कोरोनापासून संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. जरी आई स्वत: कोरोनाबाधित असली, तरी दूध पाजल्यामुळे बाळाला कोरोनाची लागण होत नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून यासंदर्भात जारी करण्यात आलेली नियमावली सगळ्यांनी पाळायला हवी’, असं विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -

मातेकडून बाळाला संसर्ग न होण्याचं कारण…

दरम्यान, मातेकडून दूध पाजण्यातून बाळाला कोरोनाचा संसर्ग का होऊ शकत नाही, याची देखील कारण मीमांसा महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे. ‘अद्यापपर्यंत महिलेच्या गर्भाशयातील स्त्राव किंवा दुधामध्ये कोरोनाचे विषाणू सापडलेला नाही. याचाच अर्थ असा होतो की गर्भधारणेवेळी किंवा दूध पाजताना मातेकडून बाळाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आरोग्य सेवक-सेविका, डॉक्टर आदींनी अशा मातांना आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी प्रवृत्त करायला हवं’, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील मातेकडून बाळाला दूध पाजताना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नगण्य असल्याचं सांगितलं आहे. दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या दरम्यान World Breastfeeding Week पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर WHO कडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -