घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटएकदा गेलेला कोरोना पुन्हा येतो, निवांत झालेल्या चीनची झोप उडाली!

एकदा गेलेला कोरोना पुन्हा येतो, निवांत झालेल्या चीनची झोप उडाली!

Subscribe

गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या अस्तित्वात जगत आहे. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून जगभरात वेगवेगळ्या देशांनी लॉकडाऊन देखील पाळले आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोरोना निघून जावा, यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. त्यासोबतच, या सगळ्याची सुरुवात झालेल्या चीनमध्ये मात्र कोरोनाचे रुग्ण अविश्वसनीयरीत्या नियंत्रित राहिल्यावर अनेकांनी संशय देखील व्यक्त केला. दुसरीकडे चीननं देखील जगभरात कोरोनावर नियंत्रण मिळवल्याच्या आविर्भावात स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र, चीनमधून जवळजवळ काढता पाय घेतलेल्या कोरोनानं पुन्हा एकदा चीनमध्ये पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनची झोप उडाली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये पहिल्यांदाच दिवसभरात सापडणाऱ्या नव्या रुग्णांची (Corona Patient) संख्या चीनमध्ये १००च्या वर गेली आहे. त्यामुळे कोरोना फक्त जाऊन फायदा नाही, तर तो पुन्हा येणार नाही, याची देखील काळजी घेणं गरजेचं असल्याचं चीनच्या या ताज्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे.

कम्युनिटी ट्रान्समिशन, परदेशी प्रवासी कारणीभूत

कम्युनिटी ट्रान्समिशन आणि आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक सुरू केल्यामुळे बाहेरच्या देशातून येणारे रुग्ण यामुळे चीनमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत चीनमध्ये वाढलेल्या १०१ नव्या रुग्णांपैकी ९८ रुग्ण हे स्थानिक पातळीवर झालेल्या कम्युनिटी ट्रान्समिशनमुळे वाढले असून ३ रुग्ण परदेशातून देशात आलेले आहेत. त्यातही स्थानिक पातळीवरच्या कम्युनिटी ट्रान्समिशनमुळे (Community Transmission) सापडलेल्या रुग्णांपैकी ८९ रुग्ण एकट्या शिनजियांग प्रांतात सापडले आहेत. यामध्ये एकही मृत्यू झालेला नसला, तरी झपाट्याने पुन्हा एकदा वाढणारी रुग्णसंख्या चीनी प्रशासनासाठी आता धोक्याची घंटा ठरू लागली आहे.

- Advertisement -

चीनची रुग्णसंख्या अजूनही ८४ हजार ०६०!

दरम्यान, चीनमध्ये लोकल कम्युनिटी ट्रान्समिशन आणि परदेशातून येणारे रुग्ण यामुळे रुग्णसंख्या वाढू लागली असली, तरी ती नियंत्रणाबाहेर जाणार नाही, असा दावा चीनी प्रशासनाने केला आहे. तसेच, याहून जास्त रुग्ण देखील आता वाढणार आहेत, असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. इतर देशामधून चीनमध्ये येणाऱ्या प्रवाशांमुळे देखील ही रुग्णवाढ होत आहे. आजघडीला चीनमध्ये एकूण सापडलेल्या रुग्णांची संख्या ८४ हजार ०६० इतकी झाली आहे, तर त्यातल्या ७८ हजार ९४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४ हजार ६३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४८२ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -