Coronavirus: निगेटिव्ह असून रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला; भडकलेल्या युवकाची डॉक्टरला मारहाण

प्रातिनिधिक छायाचित्र

दिल्ली येथील एका क्लिनिकने  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह दिल्यानंतर भडकलेल्या तरुणाने रागाच्या भरात चांगलाच राडा घातला. ज्या डॉक्टरांनी चुकीचा रिपोर्ट दिला, त्यानांही त्याने शिवीगाळ आणि मारहाण केली. पुर्व दिल्लीच्या जगतपुरी परिसरातील एका क्लिनिकने तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी याच तरुणाने दुसऱ्या एका रुग्णालयात जाऊन टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे झालेल्या मनस्तापाचा जाब विचारण्यासाठी हा तरुण काही लोकांना घेऊन आधीच्या क्लिनिकमध्ये गेला आणि तिथे त्याने चांगलाच राडा घातला. डॉक्टारांना मारहाण करणाऱ्या या तरुणाचा शोध आता दिल्ली पोलीस घेत आहेत.

जगतपुरी येथील क्लिनिकच्या प्रमुख डॉ. रीना सहगर यांनी त्या तरुणाविरोधात जगतपुरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी क्लिनिकमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याआधारे आरोपीचा शोध सुरु केला आहे. जेव्हा तरुण काही लोकांसहीत डॉक्टरांवर हल्ला करत होता, त्यावेळी आजुबाजूच्या लोकांनी मध्यस्थी केल्यामुळे मोठी हानी टळली आणि डॉक्टर, कर्मचारी थोडक्यात बचावले. आज तक या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रिना सहगल यांनी सांगितले की, शनिवारी त्यांच्या क्लिनिकमध्ये शामू नावाचा तरुण कोरोनाचा रिपोर्ट काढण्यासाठी आला होता. त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली गेली. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी हाच तरुण काही लोकांना घेऊन क्लिनिकमध्ये आला आणि त्याने आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. जेव्हा आम्ही त्याला विरोध केला, तेव्हा त्याने मारहाण करायला सुरुवात केली.

आरोपी तरुणाचे म्हणणे होते की क्लिनिकमधील डॉक्टरांनी त्याला फसविले. जेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखविला त्यानंतर त्याने डॉ. हेडगेवार रुग्णालयातून पुन्हा रॅपिट अँटिजेन टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला. त्यामुळे रिना यांच्या क्लिनिकने त्याचा रिपोर्ट चुकीचा दिला होता, असा आरोप तरुणाने लावला होता. तर डॉक्टर रिना यांचे म्हणणे होते की, तरुणाने आम्हाला निगेटिव्ह रिपोर्ट दाखविलेला नाही. त्याने आल्या आल्या फक्त शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. पोलीस आता या आरोपींचा शोध घेत आहेत.