Lockdown : आई-बापाचं हातचं काम गेलं, पैशासाठी पोटच्या मुलीलाच विकलं!

Kolkata
navi mumbai bar dancer thief caught while stealing child

कोरोनाच्या संकट काळाचा आर्थिक फटका सगळ्यात जास्त बसला तो मजूर-कामगार वर्गाला. रोजंदारीवर काम करणारे मजूर, घरकाम करणारे कामगार, बांधकाम मजूर, मालवाहतूक करणारे मजूर यांच्या हातचं काम गेलं आणि पैसा बंद झाला. त्यामुळे अगणित मजुरांवर, त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. आणि आपली उपासमार टाळण्यासाठी हे मजूर जंग-जंग पछाडू लागले. कोलकात्यामध्ये असाच एक प्रकार समोर आला असून बांधकाम मजूर आणि घरकामगार असलेल्या दाम्पत्याने आपल्या पोटच्या ३ महिन्यांच्या मुलीचाच ३ हजारांत सौदा केल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे पोलीस देखील काही काळ आश्चर्यचकित झाले होते.

पती-पत्नी दोघेही बेपत्ता!

कोलकात्याच्या घटाल परिसरात हे दाम्पत्य राहातं. पती बापन धरा रोजंदारीवर मजुरी करतो तर पत्नी तापसी घरोघरी मोलकरणीचं काम करते. पण लॉकडाऊन लागू झाल्यापासून त्या दोघांचंही काम गेलं. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अखेर त्यांनी त्यांच्याच एका लांबच्या मूल नसलेल्या नातेवाईकांना आपली मुलगी ३ हजार रुपयांमध्ये विकल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. हावडामधल्या एका घरातून जेव्हा पोलिसांनी चाईल्डलाईन या एनजीओच्या मदतीने ही चिमुरडी ताब्यात घेतली, तेव्हा सगळा प्रकार समोर आला. हे दोघे पती-पत्नी बेपत्ता असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत.

स्थानिक आमदारांचा मात्र संशय

दरम्यान, घटाल परिसरातले आमदार शंकर दलुई यांनी मात्र या घटनेवर संशय व्यक्त केला आहे. ‘राज्य सरकार या काळात गरिबांसाठी अनेक योजना राबवत आहे. मोफत तांदुळाचं वाटप केलं जात आहे. त्याशिवाय इतरही योजना आहेत. यानंतर देखील या दाम्पत्याने त्यांच्या मुलीचा सौदा केला हे न पटण्यासारखं आहे’, असं त्यांचं म्हणणं आहे. या मुलीला सध्या सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आलं असून तिच्यावर आवश्यक ते उपचार केल्यानंतर तिला अनाथाश्रमात पाठवण्यात येणार आहे.