देशद्रोहाचे कलम काढू पाहणाऱ्या राहुल गांधींविरोधातच देशद्रोहाची तक्रार

देशद्रोहाचे कलम काढून टाकू असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सांगितले होते. मात्र आता राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावावे, अशी मागणी कोर्टापुढे करण्यात आली आहे.

New Delhi
congress president rahul gandhi
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी

दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला भरण्यासाठी तक्रार नोंदविण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, “राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १२४ (अ) (IPC 124A) नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.” जोगिंदर तुली नावाच्या व्यक्तीने हे तक्रार नोंदवली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चौर है’ असे म्हटले होते, या टीकेमुळेच त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

भाजप खासदाराच्या तक्रारीवर २२ एप्रिलला सुनावणी

भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी याच मुद्द्यावर राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. त्याची सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे. कोर्टाने याआधी देखील राहुल गांधीकडे उत्तर मागितले आहे. मीनाक्षी लेखी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, राहुल यांनी राफेल प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर आणले आहे. चौकीदार चोर है, या वाक्याला त्यांनी कोर्टाचा आदेश असल्याप्रमाणे लोकांच्या समोर आणले.