अजबच! या देशात झाली रडण्याची स्पर्धा, अभिनेत्रीने जिंकला खिताब!

crying competition

हल्लीचं युग हे स्पर्धात्मक असल्याचं आपण अनेकदा ऐकतो. प्रत्येक बाबतीत इथे स्पर्धा करावी लागते. क्रीडा, मनोरंजन, साहित्य अशा क्षेत्रांमध्ये स्पर्धा भरवल्या देखील जातात. पण जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, जिथे दरवर्षी रडण्याची स्पर्धा भरवली जाते! ही स्पर्धा खास महिलांसाठीच भरवली जाते. जिचं रडणं सर्वात जास्त आणि सर्वात अस्सल, ती या स्पर्धेची विजेती ठरते. उत्तर अमेरिकी देश असलेल्या मेक्सिकोची ही परंपरा आहे. मेक्सिकोमध्ये दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी मृत्यू दिन अर्थात द डे ऑफ द डेड साजरा केला जातो. आणि हा दिवस खरंच ‘साजरा’ केला जातो. या दिवशी मेक्सिकन नागरिक आपल्या पूर्वजांच्या कबरींजवळ जातात. त्यांच्या आवडीच्या वस्तू तिथे सजवतात आणि मनापासून रडतात. यासाठी अनेकदा पैसे देऊन रडणाऱ्या लोकांना पाचारण केलं जातं. भारतात देखील राजस्थानमध्ये रुदालीची प्रथा अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे.

पण मेक्सिकोमध्ये यावर्षी कोरोनामुळे लोकांना कबरींजवळ जाऊन रडता आलं नाही. पण मेक्सिकोच्या सॅन जुआन डेल रियो शहरामध्ये भरवण्यात आलेल्या रडण्याच्या स्पर्धेत मेक्सिकन नागरिक मनसोक्त रडले. आणि यामध्ये एक अभिनेत्री विजयी ठरली. तिचं रडणं परीक्षकांना सर्वाधिक भावलं!

दरवर्षी सॅन जुआन डेल रियो शहरात ही रडण्याची स्पर्धा भरवली जाते. पण यंदा कोरोनामुळे ही स्पर्धा व्हर्च्युअल भरवली गेली. यात प्रत्येक स्पर्धकाला आपला २-२ मिनिटांचा रडण्याचा व्हिडिओ करून पाठवायचा होता. आश्चर्याची बाब म्हणजे यंदा गेल्या वेळेपेक्षा दुप्पट लोकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी कॅलिफोर्नियाच्या प्रिन्सेस कॅटलिना चावेजने पहिलं पारितोषिक मिळवलं आहे. त्यांच्या खालोखाल ५८ वर्षीय सिल्वेरिया बाल्डेरास रुबियोनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. मी आधी रडणाऱ्या महिलांना पाहिलं आहे. त्यांना पाहून तसंच रडले आणि जिंकले, असं रुबियो यांचं म्हणणं आहे.