घरदेश-विदेशरेल्वे ट्रॅकवर दररोज १५ लोकांचा मृत्यू

रेल्वे ट्रॅकवर दररोज १५ लोकांचा मृत्यू

Subscribe

रेल्वे बोर्डाने आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीनुसार, देशात दररोज १५ लोकांचा रेल्वे ट्रॅकवर मृत्यू होतो अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना, ट्रेन पकडताना अथवा ट्रेनमधून पडून २०१४ ते मार्च २०१८ दरम्यान एकूण २३,०१३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे. विविध राज्यांमधील रेल्वे पोलिसांकडून ही माहिती प्राप्त करण्यात आली आहे.

सविस्तर आकडेवारी

सिकंदराबाद, हैदराबाद, विजयवाडा, गुंटाकल, गुंटूर, नांदेड या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रात सर्वात जास्त ३,८७४ मृत्यू झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. तर त्याखालोखाल, दानापूर, धनाबाद, मुघलसराई, समस्तीपूर आणि सोनापूर ही क्षेत्रे समाविष्ट असणाऱ्या पूर्व मध्य रेल्वेचा क्रमांक लागतो. या क्षेत्रात ३,७४८ मृत्यू झाले आहेत. मुंबई, सोलापूर, पुणे, भुसावळ आणि नागपूर या मध्य रेल्वे क्षेत्रामध्ये ३,३३३ मृत्यू झाले आहेत. तर, पश्चिम मुंबई, रतलाम, अहमदाबाद, राजकोट, भावनगर आणि वडोदरा या पश्चिम रेल्वे क्षेत्रात २,३८४ मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उत्तर रेल्वेमध्ये २,१२७, उत्तर मध्य रेल्वेत १,७३८, उत्तर पूर्व रेल्वेत ७७५ अशी मृतांची संख्या आहे. उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्रात सर्वात कमी अर्थात २७८ मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

आग्रा विभाग जीआरपी डाटामधून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर, २०१७ दरम्यान आग्रा, मथुरा, फिरोजाबाद, अलिगड, हाथरा, इटावह, मेनपुरी, कासगंज या जिल्ह्यांमध्ये ५७९ प्रवासी ट्रेन पकडत असताना मृत पावले. तर मागील चार वर्षांमध्ये ह्रदविकाराचा झटका अथवा दम्याचा अटॅक आल्यामुळे ७०३ लोकांना मृत्यू आला आहे.

सुरक्षेसाठी रेल्वेकडून होतात बरेच प्रयत्न

प्रवाशांनी काळजी कशी घ्यावी यासाठी रेल्वेकडून दरवर्षी प्रचार करण्यात येतो. प्रत्येक स्टेशन्सवर प्रवाशांनी प्लॅटफॉर्मपासून लांब उभे राहावे, रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी सतत घोषणा देण्यात येतात. कोणतीही वैद्यकीय मदत लागल्यास रेल्वे सेवा तत्पर असते. तरीही या घटना सतत घडत असल्याचे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये धावत्या ट्रेनमधून १८,२५९ लोक मृत पावले तर एकूण २१,२९९ अशा अपघातांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -