घरदेश-विदेशडासू आणि राफेलचा काहीच संबंध नाही - अनिल अंबानी

डासू आणि राफेलचा काहीच संबंध नाही – अनिल अंबानी

Subscribe

राफेल प्रकरणात राहुल गांधी सतत अपप्रचार करुन अनिल अंबानी यांना राजकीय संघर्षात खेचत असल्याचा आरोप रिलायन्स ग्रुपने केला आहे.

राफेल विमानाच्या खरेदीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ताजे आरोप केल्यानंतर काही तासातच त्याला रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानीकडून प्रत्युत्तर आले आहे. काँग्रेस सातत्याने खोटी माहिती देत असल्याचे स्पष्टीकरण रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रवक्त्यांनी दिले आहे. ते म्हणाले की, “काँग्रेसने पुन्हा एकदा खोटेपणाचा कळस करत तथ्यांची मोडतोड करून रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरोधात चुकीची मोहीम उघडली आहे.”

आज (शुक्रवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल अंबानी यांनी राफेल कराराच्या बदल्यात डासू विमान कंपनीकडून आर्थिक लाभ मिळवला असल्याचा आरोप केला होता. तसेच डासूने दिलेल्या पैशातूनच अंबानी यांनी प्रकल्पासाठी जमिन खरेदी केली होती. त्याबदल्यात डासू कंपनीला रिलायन्स डिफेन्स कंपनीत ऑफसेट भागीदार करुन घेतले गेले, असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

- Advertisement -

“रिलायन्स डिफेन्सकडे नागपूर विमानतळानजीक जमिन असल्यामुळे त्यांच्याशी करार केला गेला”, अशी प्रतिक्रिया डासू कंपनीने अलीकडे दिली होती. रिलायन्सच्या प्रवक्त्यांनी गांधी यांच्या आरोपाचे खंडन करताना म्हटले आहे की, मिहान प्रकल्प, नागपूर येथील जमिनी खरेदीचा व्यवहार २०१५ ते २०१७ दरम्यान झालेला आहे. ही गुतंवणूक रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडने (RADL) डासूसोबत करार करण्याअगोदरच केली होती.

रिलायन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, काँग्रेस आगामी विधानसभा – लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनिल अंबानी यांना राजकीय संघर्षात मुद्दामून खेचत आहे.

- Advertisement -

दरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे राफेल लढाऊ विमानांच्या कराराचे दस्ताऐवज बंद लिफाफ्यात मागितले होते. यामध्ये विमानाचे तंत्रज्ञान वगळता खरेदीच्या किमतीचाही उल्लेख असावा, असे निर्देश दिले होते. मात्र यावर विचार करण्यासाठी केंद्राने दहा दिवसांचा अवधी मागितला आहे. राफेल करार हा गोपनीय असल्याकारणाने त्याची किमतीविषयी कोणतीही माहिती संसदेसमोर उघड करता येणार नाही, असे वक्तव्य सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -