अभिनेत्री दीपिका पदुकोनची मनरेगात नोंदणी, आत्तापर्यंत हजारोंची घेतली मजुरी!

deepika padukon mnrega

खरंतर बातमीचं शीर्षक वाचून तुम्हाला असं वाटेल की ही एखादी अफवा आहे किंवा एखादी व्हायरल पोस्ट आहे. पण हे खरं प्रकरण आहे. बॉलिवुड अभिनेत्री दीपिका पदुकोनची मनरेगामध्ये नोंदणी असून तिचा फोटो देखील ओळखपत्रावर आहे. या ओळखपत्राच्या मदतीने हजारो रुपयांची मजुरी घेतली गेल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. आजतकनं यासंदर्भात वृत्त दिलं असून हा सगळा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातल्या झिरनिया ग्रामपंचायतीमध्ये दीपिका पदुकोनचा फोटो असलेली ओळखपत्र आहेत. त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून हजारो रुपयांची मजुरी दिली गेल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. मात्र, ही मजुरी नक्की घेतली कुणी? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

deepika padukon mnrega

नक्की काय आहे प्रकार?

झिरनिया ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेकडो ग्रामस्थांची महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत नोंदणी आहे. त्यामधून त्यांना निश्चित अशी मजुरी देखील मिळते. मात्र, यातल्या अनेक ग्रामस्थांना आपल्या नावे रोजगार हमी योजनेत ओळखपत्र तयार आहे आणि त्यावर नियमितपणे पैसे काढले जात असल्याचं माहितीच नाही. दीपिका पदुकोनचा फोटो असलेलं ओळखपत्र देखील त्यातलंच एक. पण या ओळखपत्रावर नाव मात्र स्थानिक ग्रामस्थाचं टाकलं आहे. अधिक खोलात तपास केल्यानंतर हे लक्षात आलं की स्थानिक ग्रामपंचायतीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा करून ग्रामस्थांच्या नावे रोजगार हमी योजनेतला पैसा लाटला आहे.

actress mnrega

या गावातून तब्बल १५ ओळखपत्र अशी मिळाली आहेत ज्यावर दीपिका पदुकोनसह अनेक अभिनेत्रींचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर ग्रामस्थांची नावं आहेत. आणि त्यांच्या माहितीशिवायच या ओळखपत्रांवर मजुरीचे पैसे काढले गेले आहेत. या प्रकरणी स्थानिक जिल्हा प्रशासनानं चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं आहे.