भारत-चीनच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये बैठक: LAC वरील परिस्थिती जैसे थे करा – राजनाथ सिंह

defence minister rajnath singh meets chinese defence minister at sco in russia moscow

वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल रात्री रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे यांची भेट घेतली. मॉस्कोमधील एका हॉटेलमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० च्या सुमारास ही बैठक सुरु झाली. जवळपास दोन तासापेक्षा जास्त वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत LAC वरील परिस्थिती जैसे थे करा, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं.

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी राजनाथ सिंह रशियाला गेले असून चीनचे संरक्षण मंत्री सुद्धा या परिषदेसाठी तेथे आले आहेत. चीनकडून या बैठकीची मागणी करण्यात आली होती. मे महिन्यात लडाखमध्ये सुरु झालेल्या सीमावादानंतर प्रथमच दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये झालेली ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे. या बैठकीत पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आधी होती तशी परिस्थिती निर्माण करा, असं राजनाथ सिंह यांनी बैठकीत स्पष्ट केलं.

राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली की, “संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चिनी संरक्षण मंत्री जनरल वेई फेंगही यांच्यातील मॉस्कोमधील बैठक संपली आहे. ही बैठक दोन तास २० मिनिटं सुरु होती.” रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमधील एका नामांकित हॉटेलमध्ये भारतीय वेळेनुसार साधारण साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही बैठक सुरु झाली. भारताकडून संरक्षण सचिव अजय कुमार आणि रशियातील भारताचे राजदूत डी. बी. व्यंकटेश वर्मा सुद्धा या बैठकीत सहभागी झाले होते.