घरदेश-विदेशदिल्लीत अग्नितांडव

दिल्लीत अग्नितांडव

Subscribe

झोपेत असलेल्‍या 43 मजुरांचा होरपळून मृत्‍यू

दिल्लीतील अनाज मंडी परिसरात रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला. तर 50 हून अधिक जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मृतांमध्ये बहुतेक कामगार या इमारतीत असलेल्या छोट्या कारखान्यात काम करणारे मजूर होते. यातील बहुतेक कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशमधील होते. काहीजण शाळेच्या पिशव्या बनवत असत तर काही पॅकेजिंग करण्याचे काम करत असत. शनिवारी देखील, कामगारांनी दिवसभर काम करून नेहमीप्रमाणे ते थकल्यानंतर झोपी गेले होते. पण त्यांच्या जीवनात पहाट उगवलीच नाही. मृतांच्या नातेवाईकांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० लाखांची तर दिल्ली भाजपकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येते. इमारतीचा मालक रेहान याला अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडी परिसरात आज पहाटे हे भीषण अग्नितांडव घडले. या परिसरात असलेल्या एका तीन मजली बेकरीतील वरच्या मजल्यावर पहाटे पाच वाजता आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. हा भाग दाटीवाटीचा असल्याने मदत आणि बचावकार्यात अडथळे येत होते. तसेच ही आग आणि धुराचे लोळ आजुबाजूच्या इमारतीत पसरल्याने अनेकजण धुरामध्ये गुदरमले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे बंबही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले. मात्र बघता बघता आग वाढत गेली. दरम्यान, अग्निशमन दलाने सुमारे 50 हून अधिक जणांना वाचवले. तर आगीत जखमी झालेल्यांना आरएमएल, एलएनजेपी, हिंदू राव आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या आगीत गुदमरून सुमारे 43 जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

रात्री इमारतीत काम करणारे बहुतेक कामगार कारखान्यांमध्ये झोपले होते. प्रत्येक खोलीत १० ते १५ कामगार होते. हे सर्व कामगार दिवसभर काम करून आणि संध्याकाळी, त्यांना जेथे जागा मिळेल तेथे झोपी जात असत. रोजीरोटीच्या शोधात ते आपले घर सोडून दिल्लीला आलेले हे कामगार इथल्या अरुंद गल्लीतील खोल्यांमध्ये अत्यंत वाईट परिस्थितीत राहत होते.हे कारखाने निवासी क्षेत्रात बेकायदेशीरपणे कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी नियम-कायदे धाब्यावर बसवण्यात आले आहेत. हे कारखाने सुरू करण्यासाठी अग्निशमन विभागाकडून कोणतीही एनओसीही घेतली गेली नाही, अशी माहिती घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिली. पोलीस इमारतीच्या मालकाचा शोध घेत आहेत. सध्या मालकाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीचे भाजपाध्यक्ष मनोज तिवारी यांनीही जखमींची विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली.

- Advertisement -

अरुंद गल्ली,चुकीची माहिती

आगीच्या दुर्घटनेची तीव्रता वाढण्यास घटनास्थळावरील परिस्थिती आणि चुकीची माहिती कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. राणी झांशी रोडवरील ज्या अनाज मंडी परिसरात ही आग लागली तेथील गल्लीबोळ फारच अरुंद आहेत. तसेच या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने अग्निशमन दलाला आग शमवण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत होते. तसेच आगीसंदर्भातील माहितीसुद्धा अपूर्ण दिली गेल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. आम्हाला केवळ आग लागल्याचे सांगण्यात आले. मात्र त्या इमारतीमध्ये लोक अडकले असल्याचे सांगण्यात आले नव्हते, असे या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -