घरट्रेंडिंगपुन्हा अग्नितांडव; किर्तीनगर मार्केटला आग

पुन्हा अग्नितांडव; किर्तीनगर मार्केटला आग

Subscribe

फर्निचर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूडसाठा असल्याकारणाने आग वेगाने पसरत गेली

देशभरात अजूनही अग्नितांडवाचं सत्र सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. गुरुवारी (काल) मध्यरात्री दिल्लीच्या किर्तीनगर येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचं प्रमाण खूप जास्त असल्याने अग्निशमन दलाच्या एकूण १० गाड्यांना पाचारण करण्यात आलं. बराच काळ आगीशी झुंजल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या अग्नितांडवामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, फर्निचर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूडसाठा असल्याकारणाने आग वेगाने पसरत गेली आणि पाहता पाहता तिने भीषण स्वरुप धारण केले.

 

- Advertisement -


अग्निशमन दलाचे जवान तसंच स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागण्याची घटना घडली त्यावेळी काही कामगार मार्केटमधील दुकानांमध्येच होते. मात्र, सर्व लोकांना आगीतून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान, किर्तीनगर मार्केटमध्ये ही आग नेमकी कशामुळे लागली? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, आग लागल्यानंतर मार्केटमधील बहुतांशी सर्वच दुकान मालक देखील घटनास्थळी जमा झाले होते. त्यांनीसुद्धा आग विझवण्याच्या कामात अग्निशमन दलाच्या जवानांना सहकार्य केले. उपलब्ध माहितीनुसार, अचानक लागलेल्या या आगीमुळे फर्निचर मार्केटमधील व्यापारांचे खूप मोठे आर्थिक नुसकान झाले आहे. त्यांचा बराचसा लाकडी माल आगीत जळून खाक झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -