डोवाल यांचा दंगलग्रस्त दिल्लीचा दौरा

Mumbai
ajit doval
दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं अजित डोवाल म्हणाले.

दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र असताना देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी संध्याकाळी मौजपूर भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील नागरिकांना पुन्हा हिंसाचार होणार नाही, असे आश्वस्त केले.हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. लोकांमध्ये वैर नव्हे, तर एकतेची भावना आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हिंसा पसरवतात. दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. लोक समाधानी आहेत. सुरक्षा यंत्रणांवर मला पूर्ण विश्वास आहे. पोलीस त्यांचे काम करत आहेत. दिल्लीमध्ये कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही. आवश्यक पोलीस अधिकारी आणि जवान हे तैनात करण्यात आले आहेत; असं अजित डोवाल यांनी म्हटले आहे.

डोवाल यांनी दिल्लीतील लोकांशी संवाद साधला आणि सद्य परिस्थिती जाणून घेतली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयात बैठक घेतली. दिल्लीतील परिस्थितीवर डोवाल लक्ष ठेवून आहेत. डोवाल आणि अन्य अधिकार्‍यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.

दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती.