नोटाबंदीमुळे कर मिळण्याचे प्रमाण वाढले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा

नोटाबंदीमुळे कर मिळण्याचे प्रमाण वाढले. इतकेच नव्हेतर बनावट चलनावर अंकुश आला असून कर गोळा होण्याचा परिघही वाढला, असे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीला रविवारी ४ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून नोटाबंदीचे फायद्यांवर भाष्य केले. मात्र, काँग्रेसने या नोटाबंदीवर टीका केली असून या नोटाबंदीमुळे कर्जबुडव्यांना फायदा झाल्याचा आरोप केला आहे.

देशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी करण्यात आली. मोदी सरकारने उचललेल्या या धाडसी पावलाचे काहींनी स्वागत केले तर काहींनी त्यावर जोरदार टीका केली. विरोधक तर अजूनही या नोटाबंदीवर टीका करत आहेत. रविवारी नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण झाले असताना यानिमित्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोटाबंदीमुळे झालेल्या फायद्यांबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन पाळण्यासाठी मोदी सरकारने चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नोटाबंदी लागू केली होती. काळ्या पैशांवर अभूतपूर्व हल्ला करणारे पाऊल उचलल्याने चांगलं कर नियोजन आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली.

सीतारामन म्हणाल्या, नोटाबंदीनंतर पहिल्या चार महिन्यांत ९०० कोटी रुपयांची अघोषित मिळकत जप्त करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत ३,९५० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. सर्वेक्षणानंतर अनेक कोटी रुपयांची अघोषित मिळकतीचा खुलासा झाला. ऑपरेशन क्लीन मनीमुळे अर्थव्यवस्था औपचारिक बनवण्यास मदत झाली. अन्य एका ट्विटमध्ये सीतारामन म्हणाल्या, नोटाबंदीने केवळ पारदर्शकताच आणली नाही तर कराचा परीघ वाढवला. तसेच यामुळे बनावट चलनावरही अंकुश मिळवता आला.

काँग्रेसने दुसरीकडे सोशल मीडियातून नोटाबंदीविरोधात बोलण्याबाबत एक अभियान चालवलं. यामध्ये राहुल गांधी यांनी आरोप केला की, नोटाबंदीचा मुख्य उद्देश मोठ्या कर्जबुडव्यांचं कर्ज माफ करणं हा होता. नोटाबंदीमुळे जीडीपी वाढीच्या दरात २.२ टक्केे घट तर रोजगारामध्ये ३ टक्क्यांनी घट झाली.