भारताच्या फायद्यामुळे ट्रम्प यांना पोटदुखी, म्हणाले, ‘भारताला गरज काय?’

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेकडून विकसनशील राष्ट्र म्हणून मिळत असलेल्या फायद्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

Mumbai
President Donald Trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुरावलेल्या संबंधांमध्ये मध्यस्थी करण्याची स्वत:हूनच इच्छा व्यक्त केल्यानंतर भारतानं ही मध्यस्थी धुडकावून लावली होती. त्यामुळे तोंडघशी पडलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतावर राग काढायला सुरुवात केली आहे. भारत आणि चीन हे दोन देश आता विकसनशील राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना WTO अर्थात जागतिक व्यापार संघटनेचे फायदे देण्याचं काहीही कारण नाही, अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली आहे. या दोन्ही देशांना जागतिक व्यापार संघटनेकडून मिळणारे फायदे तात्काळ बंद केले पाहिजेत, असं देखील ट्रम्प यांनी ठामपणे म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या भूमिकेवर डब्ल्यूटीओ काय पाऊल उचलते, हे पाहाणं भारताच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे.

‘WTOनं सदस्य देशांसाठी निकष पुन्हा ठरवावेत’

डब्ल्यूटीओकडून विकसित, विकसनशील किंवा अविकसित अशा श्रेणीनुसार सदस्य देशांना व्यापारविषयक धोरणांमध्ये आणि करारांमध्ये सवलत दिली जाते. त्यामुळे आयात-निर्यात शुल्कामध्ये आणि इतर बाबींमध्ये अनेक फायदे विकसनशील किंवा अविकसित देशांना मिळत असतात. या पार्श्वभूमीवर आता भारत आणि चीनला विकसनशील देश म्हणून फायदे देण्याची काहीही गरज नाही अशी भूमिका मांडायला ट्रम्प यांनी सुरूवात केली आहे. नक्की कोणत्या निकषांच्या आधारावर सदस्य देशांना विकसनशील, अविकसित किंवा विकसित राष्ट्राचा दर्जा मिळतो हे निश्चित करण्याची आवश्यकता आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय, ज्या देशांना विकसनशील नसून देखील ते फायदे मिळत आहेत, अशा देशांवर डब्ल्यूटीओने दंडात्मक कारवाई करावी, अशी देखील भूमिका ट्रम्प घेताना दिसत आहेत.


हेही वाचा – काश्मीर प्रश्नावरील ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला

…म्हणून ट्रम्प यांचा जळफळाट?

वास्तविक भारताने गेल्या काही महिन्यांमध्ये घेतलेल्या भूमिका या अमेरिकेचं वर्चस्व न मानणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामध्ये भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये ट्रम्प यांनी मध्यस्थ म्हणून भूमिका निभावण्याची व्यक्त केलेली इच्छा धुडकावणं जसं होतं, तसंच अमेरिकेतून भारतात येणाऱ्या उत्पादनांवरील आयातशुल्क वाढवण्याचा देखील समावेश आहे. त्यामुळेच ट्रम्प यांचा जळफळाट होत असल्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here