Coronavirus Crisis: अमेरिकेसाठी पुढील २ आठवडे अत्यंत वाईट – ट्रम्प

Washington
american president donald trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत आता सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून मृतांची संख्याही वाढत आहे. ही परिस्थिती पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित करत असताना अक्षरशः हतबलता दाखवली. अमेरिकेसाठी पुढील २ आठवडे अत्यंत वाईट असणार आहेत, असे ट्रम्प म्हणाले. “अमेरिकन नागरिकांनी येणाऱ्या कठीण दिवसांसाठी तयार राहावे अशी माझी इच्छा आहे. तज्ज्ञ सांगत आहेत की, आम्हाला शेवटी काही प्रमाणात आशेचा प्रकाश दिसेल. पण ही दोन आठवडे खूप खूप वेदनादायक ठरणार आहेत”, असे ट्रम्प म्हणाले.

३० एप्रिलपर्यंत अमेरिकेमध्ये सामाजिक अंतर राखण्यासह अनेक उपाय करूनही रुग्णांचा आकडा एक ते दोन लाखांपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी या अदृश्य शत्रूशी लढण्यासाठी सतर्क राहावे, सकारात्मक राहावे, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.

अमेरिकेत मृतांचा आकडा चार हजारांच्या वर – जॉन्स

दुसरीकडे अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या बुधवारी चार हजारांच्या पुढे गेली. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृतांची संख्या ४,०७६ वर गेली आहे. शनिवारी नोंदविलेल्या आकड्यांपेक्षा ती दुप्पट आहे. शनिवारी मृतांची संख्या २,०१० होती. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, न्यूयॉर्क राज्यात ४० टक्क्यांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

व्हाईट हाऊसमधील कोरोनाव्हायरस समन्वयक डेब्रॉह ब्रिक्स यांनी एक तक्ता जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. पुढील काही महिन्यात जर काळजी घेतली गेली नाही, तर मृत्यूचा आकडा १ लाख ते २ लाख ४० हजारांच्या घरात पोहचू शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.