तुरुंगातून पळण्यासाठी त्याने केला स्वत:च्याच मुलीचा वेष! ओळखणंही कठीण!

आपल्याच मुलीसारखी वेशभूषा आणि मेकअप करून एका तस्कराने पळून जाण्याचा अजब प्रकार केल्यानंतर पोलिसांचेही डोळे क्षणभर विस्फारले!

Mumbai
photo courtesy - the guardian

तुरुंगातून निसटण्यासाठी कैदी वेगवेगळ्या शकला लढवत असतात. अशीच एक भन्नाट शक्कल रिओ-दी-जनेरिओमध्ये कैदेत असलेल्या क्लॉविनो डिसील्व्हा उर्फ शॉर्टी या कैद्याने लढवली. पण त्याच्या दुर्दैवाने तो पकडला गेला. मात्र, त्याने लढवलेली शक्कल पाहून जेलचे अधिकारी देखील काही काळ अचंबित झाले. ४२ वर्षांच्या शॉर्टीला एकूण ७३ वर्षांची कैद झाली आहे. यादरम्यान, त्याने दोनदा तुरुंगातून पळण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी त्याने तुरुंगाच्या खालून थेट बाहेरपर्यंत भुयार खोदून पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये तो यशस्वी देखील झाला होता. पण त्याला पुन्हा अटक करण्यात आलं. मात्र, दुसऱ्यांदा त्याने केलेला प्रयत्न सगळ्यांनाच अचंबित करून टाकणारा ठरला. ‘द गार्डियन’नं हा व्हिडिओ प्रकाशित केला आहे.

स्वत:च्याच मुलीची केली वेशभूषा

या दुसऱ्या प्रयत्नात या शॉर्टी महाशयांनी थेट स्वत:च्याच मुलीचा वेश करून पळ काढण्याची योजना आखली. यासाठी त्याने त्याच्या मुलीची आणि आणखी एका महिलेची मदत घेतली. डोक्यावर विग, चेहऱ्यावर मुलीसारखाच दिसणारा मास्क आणि अंगात लेडीज टी शर्ट अशा सर्व लवाजम्यासह पळण्यासाठी तयारही झाला. पण तिथेच तो फसला. तुरुंगाच्या गेटपर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षारक्षकांना त्याच्या पेहेरावावर संशय आला. त्यानंतर लगेचच या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीसाठी बोलावलं आणि त्याचा भांडाफोड झाला. पोलिसांनी त्याला मग ‘ऑन कॅमेरा’ त्याचा पेहेराव काढायला लावून त्याच्या मूळ रुपात यायला लावलं.

पाहा शॉर्टी महाशयांची करामत!

दरम्यान, या प्रकरणी शॉर्टीची मुलगी अॅना गॅब्रिएले लिआन्ड्रिओ डी सिल्वा हिच्यावर तुरुंगातून पळून जाण्याचा कट रचण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, शॉर्टीला तुरुंगात भेटायला आलेल्या एकूण ७ लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे. याच महिलेने शॉर्टीला मेकअप आणि वेशभूषेसाठी लागणारं साहित्य पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे.


हा व्हिडिओ पाहिलात का? – बसमध्ये तरुणीने केला हॉट डान्स!