Video : राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनाच राष्ट्रगीत येईना! व्हिडिओ तुफान व्हायरल!

jana gana mana

शाळांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना भारताचं राष्ट्रगीत शिकवलं जातं. आपण राहातो, त्या देशाविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान जागृत व्हावा आणि देशाच्या गौरवाचं भान विद्यार्थ्यांना यावं, हा त्यामागचा हेतू. पण राज्यातल्या सर्व शाळांची दोरी ज्या शिक्षणमंत्र्यांच्या हातात असते, त्या शिक्षणमंत्र्यांनाच जर राष्ट्रगीत येत नसेल आणि ते उलट-पुलट ओळी म्हणून ते पूर्ण करत असतील, तर त्याला काय म्हणाल? बिहारच्या शिक्षणमंत्र्यांची अशीच गत झाली आहे. बिहारच्या नवनिर्वाचित राज्य सरकारमधलेय जदयुचे अर्थात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे आमदार आणि राज्याचे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मेवालाल चौधरी अत्यंत चुकीच्या पद्धतीने राष्ट्रगीत म्हणत असल्याचं दिसून येत आहे. बिहारमधील विरोधी पक्ष राजदच्या ट्वीटर हँडलवर हा जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

याआधी देखील मेवालाल चौधरी यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, आता बिहार विधानसभा निवडणुकांनंतर पुन्हा एकदा राजदनं मेवालाल यांचा हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना ‘भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असलेले शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांना राष्ट्रगीत देखील येत नाही. नितीश कुमार जी, लाज उरली आहे का? अंतरात्मा कुठे विसर्जन केलीत?’ असा सवाल देखील विचारण्यात आला आहे.

मेवालाल चौधरी यांच्यावर २०१७मध्ये बिहारमधल्या कुलगुरुंच्या नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. या आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यानंतर नितीश कुमार यांनी मेवालाल चौधरी यांना पक्षातून निलंबित देखील केलं होतं. मात्र, कालांतराने मेवालाल यांची पुन्हा घरवापसी झाली आणि त्यांना पुन्हा एकदा शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं आहे.

पहा व्हायरल व्हिडिओ :