‘एक ही भूल कमल का फूल’- वाराणसीत लागले फलक

भाजपा सरकारच्या काळात वाराणसीच्या विकासासाठी येथे नमामी गंगे प्रकल्पासोबतच विश्वनाथ कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. मात्र येथील दुकाने या प्रकल्पामुळे नव्हे, तर मंदिर विस्तारीकरणात जात आहेत.

Varanasi
छायाचित्र सौजन्य : युट्यूब व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमधील एक गल्ली चर्चेत आली आहे. याचे कारण आहे, या गल्लीतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात लावलेले फलक. या फलकावर लिहिले आहे, ‘एक भूल कमल का फूल’, मोदीजी एक काम करो, पहले रोटी का इंतजाम करो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या लोकसभा मतदारसंघातून अशा पदद्धतीच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधून उमटत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या फलकांचे व्हिडिओही स्थानिक माध्यमे आणि सोशल मीडियावरील माध्यमांतून मागील आठवडाभरापासून प्रसारित होत आहेत.

बारा ज्योतिलिंगांपैकी प्रसिद्ध असलेले काशी विश्वेश्वर मंदिर वाराणसीमध्ये आहे. या मंदिराच्या धुंडीराज प्रवेशदवाराला लागून असलेल्या गल्लीच्या रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर दुकानदारांनी फलक लावून अशी प्रतिक्रिया दिली आहे. या रुंदीकरणात येथील 60 छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने जाणार आहेत.

येथील एका लोकल माध्यमात प्रसिदध झालेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक तहसिलदारांच्या हवाल्याने म्हटलेय विस्तारीकरण प्रकल्पबाधित दुकानदारांना सरकारी भरपाई मिळालेली आहे. त्यानंतरच त्यांची दुकाने तोडण्यात येणार आहेत. मात्र दुकानदारांना नुकसान भरपाईपेक्षा बेरोजगारीची काळजी आहे. कारण मागील 70 ते 80 वर्षांपासून त्यांची दुकाने येथे असून त्यापासून नियमित रोजगार मिळतो. मात्र रुंदीकरणात दुकाने गेल्यावर त्यांना या हक्काच्या रोजगारापासून वंचीत राहावे लागणार आहे. त्यामुळेच हे लोक फलक लावून निषेध करत आहेत. दुसऱ्या बाजूला या भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे की या लोकांनी स्वखुशीने ही दुकाने रूंदीकरणाच्या कामासाठी दिली आहेत.

वाराणसीमध्ये सुमारे साडेतीन लाख व्यापारी (बनीया) मतदार असून 2014 या निवडणुकीत त्यांनी लोकसभेचे तत्कालिन उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मोदींनी या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळविला होता. मात्र नोटबंदी आणि जीएसटीनंतर यंदा व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जातेय. याशिवाय यापूर्वीच विश्वनाथ कॉरिडॉरच्या विकासकामांमध्ये शेकडो व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने गमवावी लागली आहेत. त्यातच ऐन निवडणुकीच्या काळात या ठिकाणी फलक झळकल्याने तो चर्चेचा विषय झालाय. मात्र असे असूनही या ठिकाणी भाजपाचे उमेदवार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुमतावर फरक पडणार नसल्याचे सांगितले जात आहे.

(टिप : बाहेरच्या व्हिडिओची ही लिंक बातमीत केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिलेली आहे. त्याची कुठलीही जबाबदारी किंवा समर्थन माय महानगर करत नाही.)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here